मुंबई : अमेरिका आणि इस्त्रायल यांच्या इराणवरील संयुक्त हल्ल्यानंतर संघर्ष अधिक तीव्र झाला असून अमेरिका आणि इस्रायलच्या भीषण हल्ल्यांना इराणकडूनही प्रत्युत्तर मिळत आहे. या युद्धाचा आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूकीवरही परिणाम झाला असून सुरक्षेच्या कारणास्तव आखाती देशांतील विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. सद्यस्थितीत पर्यटनासाठी गेलेले अनेक भारतीय दुबईमध्ये अडकले आहेत. युद्धाच्या सावटामुळे त्यांना मायदेशी परतण्याची ओढ लागली असून संबंधित पर्यटन कंपन्यांकडून पर्यटकांची हॉटेल्समध्ये सोय करण्यात आली आहे. तसेच, युद्धापूर्वीच भारताबाहेर पडलेल्या पर्यटकांना अन्य देशांमध्ये पर्यटनाचा पर्याय पर्यटन कंपन्यांकडून उपलब्ध करून देण्यात आला आहे.

नोकरीच्या निमित्ताने दुबईत राहणाऱ्या भारतीयांची संख्या प्रचंड आहे. तसेच, हा काळ दुबईतील पर्यटनासाठी पोषक असल्याने अनेकजण तिथे पर्यटनासाठी गेलेले आहेत. शिवाय, शैक्षणिक कारणासाठी देखील काहीजण दुबईत वास्तव्याला आहेत. मात्र, अमेरिका आणि इस्त्रायल यांच्या इराणवरील संयुक्त हल्ल्याचा परिणाम दुबईवर झाला असून तेथील विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. अचानक रद्द झालेल्या उड्डाणांमुळे व्यावसायिक दौरे, परदेशी शिक्षण, तसेच कौटुंबिक कारणांसाठी प्रवास करणाऱ्यांची मोठी अडचण झाली आहे. युद्धामुळे दुबईतील नागरिकांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे. भारतीयांकडून पर्यटनाला पसंती मिळणाऱ्या देशांपैकी दुबई हा एक देश.

केसरी टूर्सतर्फे दुबईत पर्यटनासाठी सुमारे ६० पर्यटक गेले आहेत. युद्ध सुरू होण्याच्या काही वेळापूर्वी काही पर्यटकांचे काही गट अबुधाबीमध्ये होते. युद्ध सुरू होताच तेथील पर्यटकांना दुबईमध्ये हलविण्यात आले. सद्यस्थितीत त्यांची दुबईमधील हॉटेलमध्ये सोय करण्यात आली असून सर्वजण सुरक्षित आहेत. तसेच, टूर्स गाईड स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात आहेत, अशी माहिती केसरी टूर्सचे शैलेश पाटील यांनी दिली. आखाती देशांमध्ये जाण्यासाठी सुमारे आठ गट आरक्षित करण्यात आले आहेत. मात्र, युद्धामुळे आयोजित केलेल्या सर्व सहली पुढे ढकलण्यात आल्या आहेत. शिवाय, दुबईतून हजारो लोक भारतात येण्यासाठी विचारणा करत आहेत. एका आठवड्यात ही स्थिती पूर्ववत होण्याची आशा असून पर्यटकांना सुरक्षितरित्या भारतात आणले जाईल. तसेच, आमचे प्रयत्न अपुरे पडल्यास भारत सरकार रेस्क्यु ऑपरेशनद्वारे पर्यटकांना भारतात आणेल, असा विश्वास देखील पाटील यांनी व्यक्त केला.

दरम्यान, अबुधाबी – दुबईत पर्यटनासाठी गेलेल्या ४० पर्यटकांचा गट सुदैवाने शनिवारीच मुंबईत परतल्याचे कॅप्टन निलेश हॉलिडेजचे संचालक निलेश गायकवाड यांनी सांगितले. तसेच, आखाती देशांमध्ये जाणाऱ्या सहली रद्द करण्यात आल्या असून आरक्षण केलेल्या पर्यटकांना पैशांचा परतावा दिला जात आहे. तसेच, युद्ध सुरू होण्यापूर्वीच आखाती देशांमधील पर्यटनासाठी भारताबाहेर पडलेल्या पर्यटकांना व्हिएतनाम, भूतान व अन्य आसपासच्या सुरक्षित ठिकाणी फिरण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे, अशीही माहिती त्यांनी दिली. आंतरराष्ट्रीय पर्यटन कंपन्यांच्या डोक्यावर बाराही महिने छोटे – मोठे युद्ध, वातावरणीय बदल, पुर, भूकंप, विमान बिघाड आदी समस्यांची टांगती तलवार असतेच. त्यामुळे पर्यटन कंपन्यांना कोट्यवधी रुपयांचे नुकसान झेलावे लागते. अमेरिका – इस्रायल आणि इराणमध्ये सुरु असलेला संघर्ष लवकरात लवकर थांबवा. जेणेकरून पुन्हा व्यवसाय सुरू होईल, अशी आशा गायकवाड यांनी व्यक्त केली.