मुंबई : महापालिकेने पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील कोचाळे गावात उभारलेल्या मध्य वैतरणा धरणावर ८० मेगावॉट क्षमतेचा सौर उर्जा प्रकल्प उभारण्याचे ठरवले होते. मात्र मुंबई आयआयटीने केलेल्या तांत्रिक चाचणीनंतर या प्रकल्पातून केवळ ६.५ मेगावॉट सौर उर्जाच मिळू शकणार आहे.
मुंबई महानगरपालिकेने पालघर जिल्ह्यात मोखाडा तालुक्यातील कोचाळे गावात १०२.४ मीटर उंचीचे आणि ५६५ मीटर लांबीचे मध्य वैतरणा धरण (हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशय) २०१४ मध्ये पूर्ण केले. धरणाच्या निर्मितीच्या वेळीच जलविद्युत प्रकल्प उभारण्याच्या दृष्टिनेही तयारी करण्यात आली होती. मोठ्या स्वरुपाची वीजेची मागणी पाहता बांधा, वित्तपुरवठा, वापरा व हस्तांतरित करा या तत्त्वावर जलविद्युत निर्मिती बरोबरीने सौर ऊर्जा निर्मिती करणे अधिक फायदेशीर ठरेल, असे सल्लागारांनी सुचविले. त्यामुळे मुंबई महापालिकेने मध्य वैतरणा धरणावर २० मेगावॉट क्षमतेचा जलविद्युत, तर ८० मेगावॉट क्षमतेचा तरंगता सौर ऊर्जा असा एकूण १०० मेगावॉट क्षमतेचा वीजनिर्मिती प्रकल्प विकसित करण्याचा निर्णय घेतला होता. यानिमित्ताने मुंबई महापालिकेने संकरित ऊर्जानिर्मिती क्षेत्रात पाऊल टाकले होते.
दरम्यान, या प्रकल्पाचा आयआयटी मुंबईने अभ्यास केला असून प्रकल्पातून ८० मेगावॉट सौर उर्जा निर्माण होऊ शकणार नाही, तर केवळ ६.५ मेगावॉट वीजनिर्मितीच होऊ शकेल असे आढळून आले आहे. त्यामुळे या प्रकल्पाची वीज क्षमता खूपच कमी होणार आहे.
क्षमता का घटली?
हा तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प जलाशयातील पाण्यावर आधारित आहे. मात्र मध्य वैतरणा धरणाचे जलाशय ही मोठी निमुळती दरी आहे. पाण्याची पातळी घटत गेली की पाण्याचा पृष्ठभाग कमी होत जातो. कमीत कमी पृष्ठभाग गृहीत धरल्यास वीजनिर्मिती कमी होईल, असे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
प्रकल्पाचे आर्थिक मॉडेल असे
हा प्रकल्प उभारण्यासाठी सुमारे ५३६ कोटी रुपये इतका खर्च प्रकल्प विकासकास करावा लागणार आहे. तरी प्रकल्पाची मालकी ही महानगरपालिकेकडेच राहणार आहे. या प्रकल्पात तयार होणारी वीज पालिका खरेदी करणार आहे. या प्रकल्पातून दरवर्षी सुमारे २०८ दशलक्ष युनिट ऊर्जानिर्मिती होईल असे गृहित धरण्यात आले होते. त्यातून महानगरपालिकेच्या वीज खर्चात प्रतिवर्षी सुमारे २४ कोटी १८ लाख रुपयांची बचत होईल, असेही गृहित धरण्यात आले होते. मात्र वीजनिर्मिती कमी झाल्यास प्रकल्पाचे उद्दीष्ट्य साध्य होणार का याबाबत प्रश्नचिन्ह आहे.
