मुंबई : पनवेल रिमॉडलिंग आणि मालवाहतुकीसाठी समर्पित असणाऱ्या ‘डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर’च्या कामासाठी हार्बर मार्गावर ३८ तासांचा ब्लाॅक घेतला. हा ब्लाॅक सोमवारी दुपारच्या सुमारास संपला. त्यानंतर, पनवेल येथे सोमवारी रात्रीपासून ते शुक्रवारपर्यंत पाच दिवसांसाठी मध्यरात्रीचा वाहतूक ब्लाॅक घेतला. त्यामुळे ब्लॉक कालावधीत सोमवारी ते शनिवारपर्यंत रात्री १२.३० वाजल्यापासून ते पहाटे ५.३० वाजेपर्यंत लोकल सेवा रद्द असेल.
डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरमधील अप आणि डाऊन दोन नवीन मार्गिकेच्या बांधकामासाठी आणि उपनगरीय यार्ड रिमॉडेलिंग कामासाठी पनवेल येथे शनिवार व रविवारी ब्लाॅक घेतला. त्यानंतर पनवेल येथे पोस्ट कमिशनिंग काम करण्यासाठी ईएमयू स्टॅबलिंग साइडिंग क्रमांक १, २, ३, ४ आणि १० येथे पाच दिवसांचा ब्लाॅक घेण्यात आला आहे.
हेही वाचा – स्वच्छतेचा जागर! राज्यात ७२ हजारांपेक्षा जास्त ठिकाणी स्वच्छता मोहीम
ब्लाॅकपूर्वीचे लोकल वेळापत्रक
ब्लाॅकपूर्वी हार्बर मार्गावर पनवेलसाठी शेवटची लोकल रात्री १०.५८ वाजता सीएसएमटीसाठी सुटेल. ती लोकल रात्री १२.१८ वाजता पनवेल येथे पोहचेल. ट्रान्सहार्बर मार्गावरील पनवेलसाठी शेवटची लोकल ठाणे येथून रात्री ११.३२ वाजता सुटेल आणि रात्री १२.२४ वाजता पनवेलला पोहोचेल. हार्बर मार्गावर पनवेलहून शेवटची लोकल ब्लॉक कालावधीत वेळापत्रकानुसार असेल. तर, अप ट्रान्सहार्बर मार्गावर पनवेलहून सुटणारी शेवटची लोकल रात्री १०.१५ वाजता पनवेलहून सुटेल आणि रात्री ११.०७ वाजता ठाण्याला पोहोचेल.
हेही वाचा – मुंबई : दादर पूर्व येथे २७ वर्षीय तरुणाची हत्या
ब्लाॅकनंतर लोकल वेळापत्रक
ब्लॉकनंतर पहिली लोकल सीएसएमटी येथून पनवेलसाठी ब्लॉक कालावधीत वेळापत्रकानुसार असेल. ३ ते ७ ऑक्टोबरपर्यंत ठाण्याहून पनवेलसाठी ब्लॉक संपल्यानंतर पहिली लोकल सकाळी ६.२० वाजता ठाण्याहून सुटून सकाळी ७.१२ वाजता पनवेलला पोहोचेल. पनवेलहून अप हार्बर मार्गावरील ब्लॉकनंतर पहिली लोकल पनवेलहून पहाटे ५.४० वाजता सुटेल आणि सकाळी ६.५९ वाजता सीएसएमटीला पोहोचेल. ब्लॉकनंतर पनवेलहून अप ट्रान्सहार्बर मार्गावर ठाण्याच्या दिशेने पहिली लोकल सकाळी ६.१३ वाजता पनवेलहून सुटेल आणि सकाळी ७.०५ वाजता ठाण्याला पोहोचेल.