मुंबईतील साकीनाका परिसरात मॅनहोलमध्ये पडल्याने ५५ वर्षीय अस्लम शेख या व्यक्तीचा मृत्यू झाला. या घटनेनंतर मुंबईत प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत असून, राजकीय वातावरणही चांगलंच तापलं आहे. मुंबईचे उपमहापौर संजय घाडी यांनी मुंबई महापालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. दुसरीकडे अश्विनी भिडे यांनी या प्रकरणी दिलगिरी व्यक्त केली आहे. तसंच या ठिकाणी जाळी बसवण्याचं काम सुरु होतं त्याचवेळी दुर्घटना घडली असंही अश्विनी भिडेंनी म्हटलं आहे. तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या विधान परिषदेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी एक पोस्ट लिहिली आहे आणि या घटनेसाठी अश्विनी भिडेंनाच कसं जबाबदार धरता येईल असा प्रश्न विचारला आहे.
मिलिंद नार्वेकर यांनी व्यक्त केला संताप
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे विधान परिषदेतील आमदार मिलिंद नार्वेकर यांनी एक्सवर एक सोशल मीडिया पोस्ट केली आहे. मुंबईतील साकीनाका येथे मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याच्या घटनेबाबतची मिलिंद नार्वेकर यांची ती पोस्ट आहे. मॅनहोल दुर्घटना संतापजनक असून दोषी असलेल्या स्थानिक अधिकाऱ्यांवर कडक कारवाई झालीच पाहिजे. या दुर्घटनेसाठी मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना जबाबदार धरलं जाण कितपत योग्य आहे, असा सवाल मिलिंद नार्वेकर यांनी केला आहे.
मिलिंद नार्वेकर यांची पोस्ट काय?
मॅनहोल दुर्घटना ही नक्कीच संतापजनक असून दोषी स्थानिक अधिकाऱ्यांवर कडक कारवाई झालीच पाहिजे. परंतु, या दुर्घटनेसाठी पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनाच जबाबदार धरले जाणे कितपत योग्य आहे? स्थानिक स्तरावरील हलगर्जीपणा आधी तपासला गेला पाहिजे, असे माझे स्पष्ट मत आहे. अशी पोस्ट मिलिंद नार्वेकर यांनी केली आहे.
नेमकी घटना काय?
साकीनाका येथील खैरानी रोडवर गुरुवारी सकाळी १० च्या सुमारास ही घटना घडली. एका खासगी कंत्राटदाराकडून देखभालीचे काम सुरू असताना मॅनहोलचे झाकण उघडे ठेवण्यात आले होते. परंतु, तिथे कोणतीही सुरक्षात्मक यंत्रणा किंवा बॅरिकेड्स लावण्यात आले नव्हते. मुसळधार पावसामुळे अस्लम शेख यांना उघड्या मॅनहोलचा अंदाज आला नाही आणि त्यांचा तोल जाऊन ते २५ फूट खोल मॅनहोलमध्ये कोसळले. सदर घटनेची माहिती मिळताच पालिका अधिकारी, पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पाण्याचा वेग जास्त असल्याने शेख वाहून गेल्याची शक्यता वर्तवली जात होती; शोध मोहिमेदरम्यान त्यांची छत्री आणि चप्पलही सापडली. अखेर सुमारे चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाच्या जवानांना शेख यांना बाहेर काढण्यात यश आले, मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.
उपमहापौर संजय घाडी यांची मागणी काय?
दुर्घटनेनंतर उपमहापौर संजय घाडी यांनी पालिका प्रशासनावर घणाघाती आरोप केले आहेत. निष्काळजीपणासाठी थेट महापालिका आयुक्त अश्विनी भिडे जबाबदार असून त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी करत घाडी यांनी शिवसेना या मुद्द्यावर आक्रमक असल्याचा इशारा दिला. ज्यानंतर मिलिंद नार्वेकर यांनी अश्विनी भिडेंनाच कसं जबाबदार धरता येईल असा प्रश्न केला आहे.
