मुंबई: नागरिकांच्या आरोग्याशी आणि विशेषतः लहान मुलांच्या जीवाशी खेळणाऱ्या दूध, दुग्धजन्य पदार्थ भेसळखोरांवर संघटित गुन्हेगारी (मकोका) अंतर्गत गुन्हे दाखल करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी दिले.
विकसित महाराष्ट्र अंतर्गत या वर्षासाठी विभागासाठी निश्चित करण्यात आलेले टप्पे व त्यांच्या पूर्ततेच्या अनुषंगाने करण्यात येत असलेली कार्यवाही यासंदर्भातील बैठकीत शिंदे यांनी हे आदेश दिले. अन्न व औषध प्रशासन विभागाने यावेळी सादरीकरण करुन विभागाची माहिती दिली.
अन्नात भेसळ करणे हा केवळ साधा गुन्हा नसून तो थेट नागरिकांच्या जीवाशी खेळ आहे. लहान मुले मोठ्या प्रमाणावर दूध पितात, बनावट पनीर आणि भेसळयुक्त अन्नपदार्थांमुळे कर्करोगासारख्या दुर्धर आजाराला तोंड द्यावे लागू शकते. भेसळखोर थेट या लहान मुलांच्या आयुष्याशी खेळत आहेत. अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्या समाजकंटकांवर कोणत्याही प्रकारची नरमाई न दाखवता अशा गुन्हेगारांवर ‘मकोका’ अंतर्गत कारवाई करून त्यांच्यावर जरब बसवावा. भेसळखोरांवर कारवाई करताना त्यांचेवर अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात यावा, जेणेकरून त्यांना कायदेशीर पळवाटा मिळणार नाहीत याची दक्षता देण्याच्या सूचनाही शिंदे यांनी दिल्या.
या प्रकरणांमधील कायदेशीर प्रक्रिया अधिक बळकट करण्यासाठी विशेष पावले उचलण्याच्या सूचना शिंदे यांनी दिल्या. ज्यांच्यावर कारवाई होते, त्यांच्या खटल्यांचे कामकाज न्यायालयात सुरू असताना कोणतीही कायदेशीर त्रुटी उरता कामा नये. यासाठी नामवंत व ज्येष्ठ विधितज्ज्ञांची मदत घेण्यात यावी आणि यासाठी तातडीने एक विशेष लीगल टीम तयार करण्यात यावी, असेही शिंदे यांनी यावेळी सांगितले.
बैठकीस आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, विधि व न्याय राज्यमंत्री आशिष जयस्वाल, गृह, अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश कदम, उपमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ता, प्रधान सचिव नविन सोना, विधि व न्याय विभागाचे सचिव उदय शुक्ला, अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यासह संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
