‘स्नेह अमृत’ कक्षाची ३२ वर्षांची यशस्वी वाटचाल

शैलजा तिवले

मुंबई : नवजात बालकांना स्वत:च्या आईचे दूध मिळण्यास अडचणी होत असल्यास स्तनपान करणाऱ्या मातांकडून दूध उपलब्ध करून देता यावे, यासाठी ३२ वर्षांपूर्वी सुरू झालेल्या शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयातील स्नेह अमृत कक्ष या मानवी दूधपेढीला देशात सर्वोत्तम दूधपेढीचा बहुमान मिळाला आहे. हैदराबादमध्ये पार पडलेल्या लॅक्टेशन मॅनेजमेंट मिल्क बँकिंग अँण्ड ब्रेस्ट फिडिंग (लॅम्बकॉन) परिषदेत या दूधपेढीला धात्री पुरस्कार बहाल करण्यात आला.

स्नेह अमृत कक्ष ही भारतातीलच नव्हे तर आशियामधील पहिली मानवी दूधपेढी आहे. डॉ. अर्मिदा फर्नाडिस यांनी २७ नोव्हेंबर १९८९ साली ही दूधपेढी स्थापन केली. त्यावेळी विविध प्रकारचे संसर्ग आणि अतिसार या दोन कारणांमुळे नवजात बालकांचा मोठय़ा प्रमाणावर मृत्यू होत होता. काही वेळा प्रसूतीनंतर आई आजारी असल्यास किंवा आईला उशिरा दूध आल्यास बालकांना दूध मिळत नाही. नाइलाजाने त्यांना पावड़रचे दूध द्यावे लागते. बालकांची रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी आईचे दूध मिळावे या उद्देशातून स्तनपान करणाऱ्या मातांनी त्यांचे अतिरिक्त दूध दान करावे आणि हे दूध आईच्या दुधाला पारखे असलेल्या बालकांना मिळावे या उद्देशातून ३२ वर्षांपूर्वी या दूधपेढीची स्थापना झाली. या दूधपेढीमध्ये दरवर्षी सुमारे अठराशे ते दोन हजार लीटर दूधाचे संकलन केले जाते.

गेल्या काही वर्षांमध्ये मुदतीपूर्वी जन्माला येणाऱ्या बालकांचे प्रमाण वाढल्याचे आढळत आहे. ही बालके वजनाने कमी असल्यामुळे बराच काळ त्यांना अतिदक्षता विभागात ठेवावे लागते. यादरम्यान आईला स्तनातून दूध पिळून किंवा पंपद्वारे दूध काढण्याचे प्रशिक्षण दिले जाते आणि बाळाला आईचे दूध दिले जाते. परंतु काही वेळा बाळाला दूध मिळू शकत नाही, अशा स्थितीमध्ये दूधपेढीतील दूध दिले जाते. यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये दूधपेढीची मागणीही वाढली आहे, असे या नवजात बालकांच्या विभागातील डॉ. स्वाती मणेरकर यांनी सांगितले.

पेढीची स्थापना करणाऱ्या डॉ. अर्मिदा फर्नाडिस यांना स्तनपान या विषयात केलेल्या अमूल्य योगदानाबद्दल या परिषदेमध्ये जीवनगौरव, तर पेढी सुरू झाल्यापासून यामध्ये गेली ३२ वर्षे कार्यरत असलेल्या परिचारिका सुनंदा सूर्यवंशी यांना सुशेना अवॉर्ड फॉर हेल्थकेअर वर्कर या पुरस्काराने गौरविण्यात आले.

खासगी रुग्णालयातीलही दाते

दूधपेढीबाबत जनजागृती होत असल्यामुळे आता अन्य खासगी रुग्णालयांमध्ये प्रसूती झालेल्या माताही पेढीमध्ये दूध दे्ण्यासाठी संपर्क करत आहेत. तसेच स्तनपान करत असलेल्या अनेक माता आता दूध दान करण्यासाठी पुढाकार घेत आहेत, ही आशादायी बाब आहे, असे डॉ, मणेरकर यांनी सांगितले.

करोना काळातही कार्य सुरूच

करोना काळात मुदतपूर्व बालकांसाठी किंवा आजारी असलेल्या बालकांसाठी दूधपेढी अखंड कार्यरत होती. या काळात रुग्णालयात होणाऱ्या प्रसूतीची संख्या काही प्रमाणात कमी झाल्यामुळे दूधपेढीमध्ये दुधाचे संकलन काही प्रमाणात कमी झाले होते. परंतु टाळेबंदीच्या आधी पेढीमध्ये सुमारे ३५ लिटर दुधाचा साठा होता. त्यामुळे दुधाचा तुटवडा जाणवला नाही. तसेच या काळात दुधाची मागणीही कमी होती. त्यामुळे बाळाला आईच्या दुधाची आवश्यकता आहे आणि पेढीमध्ये दूध नाही, असे झालेच नाही. त्या काळातही दूधपेढीने अनेक बालकांना आईचे दूध पुरविले, असे डॉ. मणेरकर यांनी सांगितले.