लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : गिरण्यांच्या जमिनीवर साकारण्यात येणाऱ्या गृहयोजनेत १ ऑक्टोबर १९८१ पर्यंत काम करणाऱ्या गिरणी कामगारांना सामावून घ्यावे अशी मागणी गिरणी कामगार कर्मचारी निवारी आणि कल्याणकारी संघाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे. त्यासाठी गिरणी कामगारांच्या पात्रता निश्चितीसाठी १ ऑक्टोबर १९८१ अशी पात्रता मुदत ठेवण्याची मागणी आहे.

राज्य सरकारने गिरण्यांच्या जमिनीवरील गृहयोजनेसाठी १ जानेवारी १९८२ नंतरचे कामगार पात्र ठरविले आहेत. १८ जानेवारी १९८२ रोजी गिरणी कामगारांचा लाक्षणिक संप सुरु झाला. त्यामुळे १ जानेवारी १९८१ नंतरचे कामगार पात्र ठरविण्यात आले आहेत. पण त्याचवेळी १ ऑक्टोबर १९८२ मध्ये संप पुकारलेल्या आठ गिरण्यांमधील कामगारांना गृहयोजनेचा लाभ घेता येत नसल्याचे दिसते आहे. हिंदूस्थान मिल-ए, हिंदूस्थान मिल-बी, हिंदूस्थान मिल-क्राऊन मिल, हिंदूस्थान मिल-प्रोसेस हाऊस, स्टॅंडर्ड मिल टेक्सटाईल (प्रभादेवी), प्रकाश कॉटन मिल, श्रीनिवास मिल आणि मधुसूदन मिल अशा या आठ गिरण्या आहेत. त्यातील कामगारांना ही घरे मिळावीत यासाठी गिरणी कामगारांच्या पात्रता निश्चितीसाठी १ ऑक्टोबर १९८१ ही तारीख पात्रता मुदत (कट ऑफ डेट) निश्चित करावी अशी मागणी कल्याणकारी संघाने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

आणखी वाचा-समृद्धी महामार्गावरील खड्ड्यांची तांत्रिक चौकशी, तीन-चार दिवसात खड्डा बुजवला जाणार

या गिरण्यांमधील कामगारांची संख्या खूप आहे. तेव्हा त्यांनाही संधी द्यावी, अनेक गिरणी कामगार काही ना काही कारणाने घरांच्या योजनेसाठी म्हाडाकडे अर्ज करू शकलेले नाहीत अशा कामगारांना संधी द्यावी, अशा मागण्या कल्याणकारी संघाने केल्या आहेत.