पालिका प्रशासनाला ५० लाखांचा महसूल प्राप्त

मुंबई : विशाल झाडांची शीतल छाया, वन्यप्राण्यांचा अधिवास, पक्ष्यांची किलबिल आणि परदेशी पेंग्विनचे दर्शन घडवणाऱ्या भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाकडे (राणीची बाग) पर्यटकांची पावले वळत आहेत. करोना र्निबधांच्या शिथिलीकरणानंतर १ नोव्हेंबरला राणीची बाग पर्यटकांसाठी खुली होताच अवघ्या वीस दिवसांमध्ये सव्वा लाख पर्यटकांनी येथे भेट दिली असून प्रवेश शुल्काच्या माध्यमातून पालिकेला जवळपास ५० लाख रुपये महसूल मिळाला आहे.

भायखळा येथील राणीच्या बागेचा झपाटय़ाने होणारा कायापालट पर्यटकांच्या पसंतीस उतरत आहे. त्यामुळेच गेल्या काही वर्षांत येथील गर्दी वाढताना दिसत आहे. वन्य अधिवासाची अनुभूती देणारे प्राण्यांसाठी नव्याने उभारण्यात आलेले पिंजरे, प्राण्यांची वाढती संख्या, नेटके व्यवस्थापन याची भुरळ पर्यटकांना पडत आहे.

करोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान राणीच्या बागेचे बंद झालेले दार १ नोव्हेंबरला पर्यटकांसाठी खुले झाले. करोनाकाळात घरात अडकलेल्या मुलांसाठी ही पर्वणी होती. त्यामुळे पहिल्या दिवसापासूनच बागेमध्ये पर्यटकांची गर्दी वाढत होती. सध्या दिवसाला २ हजारांहून अधिक पर्यटक बागेत येत आहेत. सुट्टीच्या दिवशी ही संख्या दुप्पट होते. १ ते १० नोव्हेंबर या कालावधीत ५० हजार ७९६ पर्यटकांनी राणीच्या बागेला भेट दिली असून प्रवेश शुल्काच्या माध्यमातून पालिकेच्या तिजोरीत २१ लाख १८ हजार ३७५ रुपये महसूल जमा झाला आहे. नोव्हेंबरमध्ये सलग सुट्टय़ा आल्याने पर्यटकांनी मोठय़ा संख्येने बागेची सैर केली आहे. पुढच्या दहा दिवसांमध्ये हा प्रतिसाद वाढेल अशी अपेक्षा आहे. ११ ते २२ नोव्हेंबर या कालावधीत ७० हजारांहून अधिक पर्यटकांनी राणीच्या बागेला भेट दिली. यातून पालिकेला ३० लाखांहून अधिक महसूल मिळाला आहे. संग्रहालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, १ नोव्हेंबर ते २२ नोव्हेंबरदरम्यान १ लाख २५ हजार ७०२ पर्यटक बागेत आले होते. प्रवेश शुल्काच्या माध्यमातून ५० लाख ९६ हजार ४५० रुपये निधी प्राप्त झाला आहे.