scorecardresearch

कोटीच्या कोटी उड्डाणे

नाले दुरुस्ती, संरक्षक भिंतीची उभारणी, रुंदीकरण, खोलीकरण यासह रस्ते दुरुस्तीसाठी मुंबई महापालिकेतील स्थायी समितीच्या अखेरच्या बैठकीत कोटय़वधी रुपयांचे प्रस्तावांना मंजुरी मिळविण्याचे प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत.

अखेरच्या बैठकीत विविध कामांसाठी साडेतीन हजार कोटी रुपयांहून अधिक खर्चाचे प्रस्ताव

मुंबई : नाले दुरुस्ती, संरक्षक भिंतीची उभारणी, रुंदीकरण, खोलीकरण यासह रस्ते दुरुस्तीसाठी मुंबई महापालिकेतील स्थायी समितीच्या अखेरच्या बैठकीत कोटय़वधी रुपयांचे प्रस्तावांना मंजुरी मिळविण्याचे प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. नाल्यांशी संबंधित २७० कोटी रुपये, र्पजन्य जलवाहिन्यांची दुरुस्ती, बळकटीकरणासाठी ३९८ कोटी २१ लाख रुपये तर रस्त्यांशी संबंधित १०० कोटी रुपयांहून अधिक खर्चाचे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. जलाशय बोगदा, बोरिवलीचे शताब्दी, नाहूर, नायर रुग्णालये, मलबार हिल जलाशय यासह विविध कामांचे एकूण साडेतीन हजार कोटी रुपयांचे प्रस्ताव अखेरच्या बैठकीच्या कार्यक्रमपत्रिकेवर समाविष्ट करण्यात आले आहेत. स्थायी समितीमधील मागील बैठकीतील राखून ठेवलेले विविध कामांचे ९५, तर सोमवारच्या बैठकीत नव्याने १६० हून अधिक प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. या प्रस्तावांना मंजुरी मिळणार की निवडणुकीनंतर स्थापन होणारी स्थायी समिती प्रस्तावांवर मंजुरीची मोहर उमटविणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

मुंबई महापालिका सभागृहाची मुदत ७ मार्च २०२२ रोजी संपुष्टात येत आहे. मात्र अद्यापही पालिकेच्या निवडणुकीची घोषणा झालेली नाही. त्यामुळे पालिकेवर होणाऱ्या प्रशासकाच्या नियुक्तीकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. पालिकेच्या विविध कामांसाठी स्थायी समितीची मंजुरी घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे विद्यमान सभागृहाची मुदत संपुष्टात येण्यापूर्वी मोठय़ा संख्येने कमांना मंजुरी मिळविण्याचे प्रयत्न प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. स्थायी समितीच्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत विविध कामांचे १८० प्रस्ताव सादर करण्यात आले होते. मात्र भाजपने विरोध केल्यामुळे सुमारे ९५ प्रस्ताव राखून ठेवण्यात आले.

स्थायी समितीची ७ मार्च रोजी अखेरची बैठक होत आहे. या बैठकीच्या कार्यक्रमपत्रिकेवर १६० प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. नाले वळविणे, दुरुस्ती, संरक्षक भिंत बांधणे, खोलीकरण, पेटिका नाल्यांची दुरुस्ती अशा स्वरुपाच्या कामांचे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. त्याचबरोबर विविध भागांतील रस्त्यांच्या दुरुस्तीच्या कामांचाही त्यात समावेश आहे. त्याचबरोबर पावसाळय़ात पाणी साचू नये यासाठी ठिकठिकाणचे पर्जन्य जलवाहिन्यांचे जाळे बळकट करण्याच्या दृष्टीने दुरुस्तीची कामे हाती घेण्याचा प्रशासनाचा मानस आहे. त्यांचेही प्रस्ताव घाईघाईत अखेरच्या बैठकीच्या कार्यक्रमपत्रिकेत समाविष्ट करण्यात आले आहेत.

पर्जन्य जलवाहिन्यांचे बळकटीकरण

पावसाळय़ात सखलभागात पाणी साचू नये यासाठी पालिकेने मुंबईत पर्जन्य जलवाहिन्यांचे जाळे उभारले आहे. मात्र, त्रुटी आणि चुकीच्या कामांमुळे सखलभागात पावसाचे पाणी साचून मुंबईकरांना त्रास सहन करावा लागत आहे. आता प्रशासनाने ठिकठिकाणच्या पर्जन्य जलवाहिन्यांचे बळकटीकरण, विस्तारीकरण आणि दुरुस्तीसाठी तब्बल ३९४ कोटी २१ लाख रुपयांहून अधिक खर्चाचे प्रस्ताव स्थायी समितीला सादर केले आहेत. पवई घाटकोपर जलाशय बोगद्यासाठी ५१५ कोटी रुपये, शताब्दी, नाहूर, नायर रुग्णालयांसाठी अनुक्रमे ४३२ कोटी रुपये, ६७० कोटी रुपये व २९६ कोटी रुपये, अग्निशमन दलाशी संबंधित १२६ कोटी रुपये, मलनि:स्सारण वाहिन्यांच्या कामांसाठी ८० कोटी रुपये आदी विविध कामांच्या प्रस्तावांचा त्यात समावेश आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Millions flights meeting proposed spend various works ysh

ताज्या बातम्या