लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्ध रांगा… तिरंग्याला मानवंदना देत होणारे संचलन… स्वातंत्र्यदिनी सर्वच शाळांमधील हे चित्र यंदाही दिसेल, मात्र त्याचा अविभाज्य भाग असलेल्या गणवेशाची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवेल… बहुतांशशाळांपर्यंत अद्यापही गणवेश पोहोचलेला नसल्याने ही परिस्थिती उद्भविली आहे.

दरवर्षी शालेय स्तरावर होणारी गणवेश खरेदीची पद्धत मोडीत काढून राज्याच्या पातळीवर एकच गणवेश लागू करण्याचा निर्णय शासनाने घेतला. कंत्राटदार पद्माचंद मिलापचंद जैन यांनी कापलेले कापड गट शिक्षणाधिकारी कार्यालयास पुरवून त्यानंतर स्थानिक महिला बचत गटांद्वारे गणवेश शिवून शाळेत द्यायचे आहेत. मात्र, अद्यापही गणवेश शाळांपर्यंत पोहोचलेले नाहीत. अपवाद वगळता बहुतेक शाळांना गणवेश मिळालेले नसून अनेक शाळा तर अद्याप १०० रुपयांत गणवेश शिवून देणाऱ्या बचतगटांच्या शोधात आहेत. काही ठिकाणी एकाच गटाला तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांचे गणवेश शिवण्याचे कंत्राट देण्यात आल्याने काम रखडले आहे. गणवेशाअभावी राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना साध्या कपड्यांमध्येच ध्वजवंदनाला जावे लागणार असल्याचे स्पष्ट आहे. काही शाळांमध्ये गणवेश मिळाले असले तरी मळखाऊ रंग, कापडाचा दर्जा याबाबत पालक आणि शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. गणवेशाच्या मापातही गोंधळ आहेत. त्यामुळे आलेले गणवेश विद्यार्थ्यांना व्हावेत, यासाठी दुरुस्ती करावी लागणार असल्याची तक्रार आहे.

हेही वाचा >>>मुंबई विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत, ठाकरे गट आणि अभाविपत लढत

सोमवारी सायंकाळपर्यंत गणवेश मिळाले नसल्याचे जळगाव, लातूर, पालघर, सोलापूर, नागपूर, हिंगोली, पुणे, नगर, नाशिक, रायगड या जिल्ह्यांतील शिक्षकांनी सांगितले.

●गणवेशासाठी पालकांनी शिक्षकांकडे तगादा लावला आहे. काही शाळांमध्ये गेल्यावर्षीचा गणवेश घालून विद्यार्थी येत आहेत.

●काही गरीब कुटुंबांमध्ये तर शाळेतून मिळणारा गणवेश हेच मुलांसाठी ‘नवे कपडे’ असतात. ही बाब लक्षात घेऊन शाळा रंगिबेरंगी गणवेश निवडत असत.

●त्यामुळे विद्यार्थ्यांमध्येही नव्या गणवेशाची उत्सुकता असे. यंदा मात्र विद्यार्थ्यांचा संपूर्ण विरस झाला आहे.