मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत तब्बल आठ नगरसेवक निवडून आलेल्या एमआयएमला मोठा फटका बसला आहे. मानखुर्द – शिवाजीनगरमधील प्रभाग क्रमांक १३८ मधून निवडून आलेल्या नगरसेविका रोशन इरफान शेख यांचे परभणी येथील जात प्रमाणपत्र अवैध ठरले आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक १३८ ‘इतर मागासवर्गीय’ (ओबीसी) प्रवर्गासाठी राखीव होता. या प्रभागातून रोशन शेख यांनी २०२६ च्या महापालिका निवडणुकीत विजय मिळवला होता. त्यानंतर त्यांनी जुलाह (इतर मागासवर्ग) जातीचे प्रमाणपत्र पडताळणीसाठी परभणीच्या जिल्हा जात प्रमाणपत्र समितीकडे सादर केले होते. निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर असलेले समाजवादी पक्षाचे (सपा) उमेदवार मोहम्मद महफूज शेख यांनी रोशन शेख यांच्या जात प्रमाणपत्राला आव्हान दिले होते. त्यामुळे हे प्रकरण परभणी येथील जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे वर्ग करण्यात आले. तेथील समितीने हे जात प्रमाणपत्र अवैध ठरवले आहे.
नगरसेवक पद रद्द करण्याची मागणी…
या प्रकरणी महम्मद मेहफूज शेख यांनी मुंबई महापालिका आयुक्त आणि निवडणूक विभागाला पत्र पाठवून शख यांचे नगरसेवक पद रद्द करण्याची मागणी केली आहे. रोशन शेख यांचे जातप्रमाण पत्र समितीने अवैध ठरवून जप्त केले आहे. त्यामुळे रोशन मोहम्मद सलीम शेख यांना अपात्र ठरवून त्यांचे नगरसेवक पद रद्द करावे. तसेच त्यांना आजतागायत दिलेले सर्व लाभ पूर्वलक्षी प्रभावाने रद्द करून ते वसूल करावेत, अशी मागणी मोहम्मद महफूज शेख यांनी पत्रात केली आहे.
दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवणाऱ्या नगरसेवकाला संधी
या प्रभागातून समाजवादी पक्षाचे मोहम्मद महफूज शेख यांनी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली आहेत, तर तिसऱ्या क्रमांकावर शिवसेना (ठाकरे) पक्षाचे अर्जून शिंदे आहेत. महापालिका सभागृहात रोशन शेख यांचे नगरसेवक पद रद्द झाल्याची घोषणा झाल्यास त्या दिवसापासून मोहम्मत महफूज शेख नगरसेवक होतील. एमआयएमने उच्च न्यायालयात धाव घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या निर्णयाला न्यायालयाने स्थगिती दिली तरच त्यांचे पद टिकू शकेल.
एमआयएम दाद मागणार
आमच्या नगरसेविकेचे जात प्रमाणपत्र अवैध ठरले तरीही त्याविरोधात आम्ही उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत. उमेदवारी अर्ज भरताना सगळी कागदपत्रे व्यवस्थित भरली होती आणि त्याची पडताळणीही झाली होती. तरीही आता हा निर्णय आला आहे. त्याला न्यायालयात आव्हान देणार आहोत अशी प्रतिक्रिया एमआयएमचे गटनेते विजय उबाळे यांनी दिली.
