मुंबई : कंत्राटदारांनी ज्या पध्दतीने रस्त्यांच्या कामाचे नियोजन करायला हवे होते, ते केलेले नाही. जे कंत्राटदार काम करत नाही त्यांच्यावर दामदुप्पट दंड आकारा, असे निर्देश उपनगरचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी मुंबई महापालिका प्रशासनाला दिले. पूर्व उपनगरातील रस्ते बांधणीच्या कामाची ॲड. आशिष शेलार यांनी बुधवारी पाहणी केली.

मुंबई पूर्व उपनगरातील घाटकोपर येथील एम. पी. वैद्य मार्ग ते टिळक रोड जंक्शन या रस्त्याची पाहणी करण्यात आली. गेले ६ महिने खोदून ठेवलेल्या रस्त्यावर पहाटे सिमेंट काँक्रीट टाकण्यात आल्याची तक्रार स्थानिक रहिवाशांनी पालक मंत्र्यांकडे केली. यावेळी महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर उपस्थित होते.

मुंबई पूर्व उपनगरातील घाटकोपर पश्चिम ते विक्रोळी पार्क साईट रस्त्याची पाहणी करताना येथील रस्त्यावर काही तासांपूर्वीच सिमेंट काँक्रीट टाकण्यात आल्याचे निदर्शनास आले. यामुळे स्थानिक नागरिक त्रस्त असून त्यांनी कंत्राटदारांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. भांडूप पश्चिम येथील अशोक केदारे चौक आणि टेंभी पाडा रस्त्यांच्या कामांची पाहणी करण्यात आली. या ठिकाणी रस्त्यांचे काम अपूर्ण असून, केवळ अर्धे काँक्रीटीकरण झाले असून रस्त्याची पातळी योग्य नाही, अशी गंभीर स्थिती निदर्शनास आली. स्थानिक भाजप पदाधिकारी आणि रहिवाशांनी कंत्राटदाराबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. ही बाब अभिजीत बांगर यांच्या निदर्शनास आणून देत याबाबत तातडीने सुधारणा करण्याचे निर्देश ॲड. शेलार यांनी दिले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या दौऱ्यात आमदार पराग शाह, आमदार मिहिर कोटेचा, माजी नगरसेवक नील सोमैया, प्रकाश गंगाधरे, भालचंद्र शिरसाट, प्रभाकर शिंदे यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते आणि स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.