काशिफ खानने राज्याचे मंत्री अस्लम शेख यांच्यावर पार्टीत येण्यास दबाव टाकला होता. तसेच तो आमच्या सरकारमधील विविध मंत्र्यांच्या मुलांना पार्टीत बोलावण्याचा विचार करत होता. अस्लम शेख तिथे गेले असते तर उडता पंजाबनंतर उडता महाराष्ट्र झाला असता, असे खळबळजन दावा नवाब मलिक यांनी रविवारी केला होता. त्यानंतर आता मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

“महाराष्ट्र सरकारल बदनाम करण्याची आणि ते पाडण्याचा कट पहिल्या दिवसापासून होत आहे. आर्यन खान प्रकरणात ज्या गोष्टी समोर आल्या आहेत त्यामध्ये नवाब मलिक यांनी मला क्रूझ पार्टीसाठी बोलवले होते असे सांगितले. काशिफ नावाच्या व्यक्तीला मी ओळखत नाही त्याने मला पार्टीसाठी बोलवले होते. मुंबईचा पालकमंत्री असल्याने लोक मला कार्यक्रमांसाठी बोलवतात. अशाच प्रकारे मला क्रूझवरही आमंत्रित करण्यात आले होते. या प्रकरणात अनेक गोष्टी समोर आल्यानंतर दोन तपास यंत्रणा तपास करत आहेत. जर तो मला भेटला होता त्याच्याकडून माहिती समोर येऊ शकते,” असे मंत्री अस्लम शेख यांनी म्हटले आहे.

“दिवसभरात ५० लोक मला आमंत्रित करत असतात. जिथे मला जायचेच नाही तिथली किंवा त्या व्यक्तीची माहिती मी घेत नाही. सुरुवातीला हे प्रकरण ड्रग्ज संदर्भात होते असे वाटत होते. शाहरुख खानच्या मुलाचे नाव आले तेव्हा संपूर्ण माध्यमांनी त्याच्याबाबत बातम्या द्यायला सुरुवात केली. त्याचवेळी गुजरातमध्ये २० हजार कोटींचे ड्रग्ज पकडले गेले त्यावर कोणतीही चर्चा झाली नाही. आर्यन खानने ड्रग्ज घेतलेही नव्हते आणि त्याच्याजवळही ड्रग्ज सापडले नाहीत अशी माहिती समोर आली आहे. त्याला पुनर्वसन केंद्रात पाठवालयला हवे होते की त्याला तस्कर म्हणून दाखवायचे होते हे तुमचे काम होते.

काशिफ खानकडे माझा मोबाईल नंबर आहे की नाही हे मला माहिती नाही. कारण माझ्या पीएकडे माझा मोबाईल असतो. मी कुठेही गेल्यावर लोक त्याच्याकडे येण्यासाठी मला आमंत्रित करतात त्यातील तो एक भाग आहे. यामध्ये पुढे काय आहे हे तपास यंत्रणा बघतील, असे अस्लम शेख म्हणाले.

“काशिफ खानने मला फोन केला आणि त्याच्यासोबत बोलल्याचे मला तर आठवत नाही. आम्ही दोघे एकमेकांना ओळखत नाही. तो एका ठिकाणी मला भेटला आणि त्याने मला आमंत्रित केले आणि तिथेच ही गोष्ट संपली,” असे अस्लम शेख यांनी म्हटले आहे.

“सुशांत सिंह प्रकरणातही दिशाच्या आत्महत्येचे प्रकरण सुरु होते तेव्हाही मुंबई उपनगरच्या पालकमंत्र्यांचे नाव घेण्यात आले होते. भाजपाच्या नेत्यांनी या प्रकरणात त्यांचे नाव जोडण्याचा प्रयत्न केला. जोपर्यंत बिहारची निवडणूक होती तोपर्यंत हे प्रकरण सुरु राहिले. काही माध्यमांच्या प्रमुखांनी सुशांत सिंहची हत्या झाल्याचे म्हटले होते. याप्रकारे आम्ही लोकांच्या समोर गेल्यावर काय होणार आहे,” असे अस्लम शेख म्हणाले.

“जर कोणाकडे पुरावे असतील तर त्यांनी ते समोर आणावेत. करोनाकाळातही सरकारला बदनाम करण्यात आले होते. नोटबंदीमध्ये इतक्या लोकांचा मृत्यू झाला त्यावर चर्चा झाली नाही. महाराष्ट्रात एवढी संकटे आली तर सरकारने लोकांसोबत उभे राहण्याचे काम केले. केंद्र सरकारचे लोक हेलिकॉप्टरने आले आणि निघून गेले. महाराष्ट्र सरकारला काहीच मिळाले नाही,” असे अस्लम शेख यांनी म्हटले आहे.

“क्रूझला परवानगी देण्याचे काम राज्य सरकारचे नाही. माझ्या विभागातर्फे क्रूझला कोणतीही परवानगी देण्यात आली नव्हती. पण क्रूझ पर्यटनाला माझा विरोध नाही. जर काही घटना घडली तर त्यावर कारवाई व्हायला हवी. त्यामुळे या मुलांना आरोपी बनवू नका. तस्करांना पकडा,” असे अस्लम शेख म्हणाले.