मुंबई : लोकसभेत महिला आरक्षण विधेयक मंजूर न झाल्याच्या निषेधार्थ भाजपने वरळी डोमच्या दिशेने काढलेल्या मोर्चामुळे झालेल्या वाहतूक कोंडीत अडकलेल्या महिलेविरुद्ध कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही, असे परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त कृष्णकांत उपाध्याय यांनी स्पष्ट केले आहे.

भाजपच्या ‘महिला आक्रोश’ मोर्चादरम्यान वाहतूक कोंडीत अडकल्यामुळे एका संतप्त महिलेने मंत्री गिरीश महाजन यांना भररस्त्यात जाब विचारला. ही घटना वरळी परिसरात घडली. आपल्या मुलाला शाळेतून आणण्यास उशीर झाल्यामुळे या महिलेने संताप व्यक्त केला आणि आंदोलनाला विरोध केला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या महिलेने गाडीतून उतरून थेट गिरीश महाजन आणि आंदोलक महिलांना खडे बोल सुनावले.

या मोर्चामुळे वरळी आणि आसपासच्या परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. शेकडो वाहनचालक तासनतास रस्त्यावर अडकून पडले होते. या महिलेने आपला थेट मंत्री गिरीश महाजन यांची गाडी अडवून त्यांना जाब विचारला. “जे काही बोलायचे आहे ते मोकळ्या मैदानात जाऊन बोला, रस्ता अडवून लोकांना त्रास देऊ नका,” असे म्हणत तिने संताप व्यक्त केला. व्हायरल व्हिडिओमध्ये ती महिला पोलिसांशीही वाद घालताना आणि बाटल्या भिरकावताना दिसत असल्याचा आरोप करण्यात आला होता.

या घटनेनंतर सोशल मीडियावर दोन गट पडले. काही लोक सामान्य जनतेला होणाऱ्या त्रासाबद्दल महिलेच्या बाजूने उभे राहिले आहेत, तर काही जण लोकप्रतिनिधींशी वागण्याच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला होता.

 या महिलेने पोलिसांशी गैरवर्तन केल्याचा आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा आरोप करत, वकील गुणरत्न सदावर्ते यांची मुलगी झेन सदावर्ते हिने वरळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या घटनेनंतर राजकीय वर्तुळात उलट-सुलट प्रतिक्रिया उमटल्या असून, आंदोलनादरम्यान सामान्यांची गैरसोय होऊ नये यावर चर्चा सुरू झाली आहे. मात्र पोलिसांनी संबंधित महिलेवर कुठलीही कारवाई न करण्याचा निर्णय घेतला आहे. लोकप्रतिनिधी आणि कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांशी उद्धटपणे वागणे खपवून घेतले जाणार नाही. या महिलेने वापरलेली भाषा आणि तिचे वर्तन आक्षेपार्ह आहे. त्यामुळे पोलिसांनी लवकरात लवकर एफआयआर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी झेन सदावर्ते यांनी केली होती.