राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचं एक ट्वीट सध्या चांगलंच चर्चेत आहे. जितेंद्र आव्हाड यांनी सरहद गांधी म्हणून प्रसिद्ध असलेल्या खान अब्दुल गफार खान यांच्या पुण्यातिथीनिमित्त हे ट्वीट केलंय. यात त्यांनी महात्मा गांधी आणि अब्दुल गफार खान यांच्या नात्याविषयी आठवण सांगताना गांधी गफार खान यांच्यासाठी मांसाहार बनवायला लावायचे, असं म्हटलंय. आव्हाड यांच्या या ट्वीटवर अनेक प्रतिक्रिया देखील येत आहेत. जितेंद्र आव्हाड म्हणाले, "गफार खान जेव्हा गांधीजींना भेटायचे, तेव्हा गांधीजी कटाक्षाने मांसाहार बनवायला लावायचे. अफगाणिस्तान हा गफारखान यांचा मूळ प्रदेश होता. ते मांसाहारी होते. त्यांच्या जेवणाची आबाळ होवू नये म्हणून बापू स्वतः लक्ष ठेवून असायचे. बापू-खान यांचं नातं वेगळं होतं. त्याला सन्मानाचा भरभक्कम आधार होता." दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी सकाळी ट्वीट करत खान अब्दुल गफार खान यांना अभिवादनही केलं होतं. ते म्हणाले, "सरहद गांधी या नावाने लोकप्रिय असणारे स्वातंत्र्य सैनिक, भारतरत्न खान अब्दुल गफार खान यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन!" हेही वाचा : …तर भारतात पंतप्रधानांविरोधात बोलणाऱ्या ‘या’ मुलीविरोधात UAPA अंतर्गत गुन्हा दाखल झाला असता; आव्हाडांचं ट्वीट जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्वीट्समधून गांधीजी इतरांच्या आहार संस्कृतीचा आदर करायचे असंच यातून नमूद केलंय. तसेच आहार वेगळा असूनही गांधीजी इतरांशी सन्मानाने आणि प्रेमान वागायचे असंही या ट्वीटमधून सुचवण्याचा प्रयत्न केलाय.