मुंबई : इस्रायल, अमेरिका – इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशात इंधनटंचाई निर्माण झाली असून सामान्य नागरिकांना त्याचा मोठा फटका बसत आहे. गॅसटंचाईची झळ सामान्य नागरिकांना बसत असताना मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केवळ जैन मंदिरांना गॅस सिलिंडरचा पुरवठा करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. ही बाब समोर आल्यांनतर लोढा यांच्यावर प्रचंड टीका होऊ लागली आहे.

पश्चिम आशियात यु्द्ध सुरू असल्याने होर्मुझ सामुद्रधुनीतून होणाऱ्या जहाजांची वाहतूक थांबली असून त्याचा परिणाम भारताच्या खनिज तेल, लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस, लिक्विफाइड नॅच्युरल गॅस पुरवठ्यावर झाला आहे. एलपीजी व एलएनजी पुरवठ्यासाठी भारताला पश्चिम आशियावर सर्वाधिक अवलंबून राहावे लागते. त्यामुळे सर्वाधिक फटका भारताला होणाऱ्या एलपीजी व एलएनजी पुरवठ्याला बसला आहे. त्यामुळे मुंबईतील हजारो व्यवसाय संकट आले आहेत.

सामान्यांना गॅस सिलिंडर सहज उपलब्ध होत नसल्याने त्यांचीही पंचाईत झाली आहे. जैन मंदिरांमध्येही गॅस टंचाई जाणवत असल्याने प्रसाद व अन्य खाद्यपदार्थ बनविणे कठीण झाले आहे.

या समस्येची दखल घेऊन मंगलप्रभात लोढा यांनी जैन श्री दर्शन प्राइड जैन संघाला पत्र पाठवून गॅस सिलिंडरचा पुरवठा करण्याची तयारी दर्शविली. अनेक जैन मंदिरांकडून याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. २८ मार्च ते ४ एप्रिल या कालावधीत होणाऱ्या ओलीसाठी गॅसची आवश्यकता असल्यास वैयक्तिक फोन नंबरवर संपर्क साधून त्याबाबत माहिती द्यावी, असे त्यांनी पत्रात नमूद केले.

मुंबईत सामान्य नागरिक देखील या समस्येमुळे भरडले जात असताना लोढा यांनी केवळ जैन मंदिरांना खास मदत करण्याचा निर्णय घेतल्याने नागरिकांकडून टीका केली जात आहे. अन्य काही संस्थांनीही लोढा यांच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली आहे. लोढा फक्त जैन समाजाचेच आहेत. त्यांना इतर सामान्य लोकांशी काही देणेघेणे नाही, अशी टीका ‘आम्ही गिरगांवकर’ संस्थेकडून करण्यात आली. याबाबत मंत्री लोढा यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.

धार्मिक कामासाठी लागणारा गॅस सामान्य कोट्यातून उपलब्ध होत नाही. माझ्या विधानसभा क्षेत्रात कोणालाही धार्मिक कामासाठी गॅसची आवश्यकता असल्यास त्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन. काही व्यक्ती राजकीय हेतूने अफवा पसरवत आहेत, ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे. त्यांच्याकडेही धार्मिक कामासाठी अशी कोणती मागणी आल्यास ती त्यांनी माझ्याकडे पाठवावी.– मंगलप्रभात लोढा, कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री.