देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या गंभीर आरोपांना नवाब मलिकांचे प्रत्युत्तर, म्हणाले…

देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपाला नबाव मलिक पत्रकार परिषद घेत उत्तर दिले आहे.

मंत्री नवाब मलिक आणि एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत. वानखेडे कुटुंबानंतर नवाब मलिकांनी भाजपाच्या नेत्यांवर देखील ड्रग्ज संदर्भात गंभीर आरोप केले आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ड्रग्जच्या व्यवसायत सहभाग असल्याचे नवाब मलिक म्हणाले होते. दरम्यान, नवाब मलिक आणि एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यात सुरु असलेल्या शाब्दीक युद्धानंतर देवेंद्र फडणवीस यांनी देखील पत्रकार परिषद घेत नवाब मलिकांवर गंभीर आरोप केले आहेत. या आरोपाला नवाब मलिक यांनी देखील उत्तर दिले आहे.

“देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळीनंतर बॉम्ब फोडणार असल्याचे म्हटले होते. मात्र त्यांचे फटाके भिजले त्यामुळे त्याचा आवाज नाही आला, असे मलिक म्हणाले”. अंडरवर्ल्डशी संबंध असल्याच्या फडणवीसांच्या आरोपावर मलिक म्हणाले, “देवेंद्रजी आपण १९९९ मध्ये या (मुंबई) शहरात पहिल्यांदा आमदार बनून आले. ६२ वर्षाच्या आयुष्यात या शहरात तुमच्याआधी दिवंगत दिवंगत मुंडे साहेब होते जे दाऊद सोबत लोकांना जोडत होते. आम्ही मंत्री होतो तेव्हा सुद्धा मुंडे साहेबांचे भाषण विधानसभेत होत असत. मात्र एवढ्या वर्षात आमच्यावर कोणी आरोप लावू नाही शकलं. आज एका जागेसंदर्भात काही कागदपत्र तुम्ही लोकांसमोर ठेवले. कवडीमोल जमीन आम्ही माफियांकडून खरेदी केली, असा आरोप तूम्ही केला. मात्र तुम्हाला माहिती देणारे कच्चे खिलाडी आहेत.”

देवेंद्र फडणवीस यांचा अंडरवर्ल्डशी असलेला खेळ उघड करणार

नवाब मलिक म्हणाले, “देवेंद्रजी तुम्ही सांगितले असते तर मीच तुम्हाला कागदपत्र दिले असते. मात्र तुम्ही अंडरवर्ल्डचा खेळ सुरु केला. आज मी सगळ्या गोष्टी सांगणार नाही. मात्र उद्या सकाळी १० वाजता तुमचा अंडरवर्ल्डशी असलेला खेळ आणि मुख्यमंत्री असतांना अंडरवर्ल्डचा सहारा घेऊन तुम्ही कशाप्रकारे संपुर्ण शहराला बंदी बनवले होते. याची माहिती मी देणार आहे.”

जमीन खेरेदीच्या आरोपावर मलिकांते स्पष्टीकरण

जमीन खेरेदी प्रकरणात बनावट भाडेकरु बनवण्यात आल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. यावर मलिक म्हणाले, “फडणवीसांनी आरोप केलेल्या कुर्ल्यामधील जागेवर मदिनेत्तूल आमान कोऑपरेटीव्ह हाउसिंग सोसायटी आहे. १९८४ मध्ये तिथे बिल्डींग बांधण्यात आली. जिला गोवावाला कंपाऊंड असं म्हटलं जातं. यामध्ये मुदीरा प्लंबर यांनी रस्सीवाला यांना विकासाचे अधिकार देत त्याठीकाणी १४० ते १५० घरं बनवून सामान्य लोकांना विकले. त्याच्यामागे असलेल्या जमिनीवर झोपडपट्टी आहे. त्याठिकाणी आमचे एक गोडाऊन आहे. मुनिरा यांनी तो ३० वर्षापासून भाड्याने एका कंपनीला दिला आहे. आमची त्याच मालमत्तेत चार दुकाने होती”

नवाब मलिक म्हणाले, “जेव्हा १९९६ मध्ये शिवसेना-भाजपाची सरकार होती. तेव्हा ९ नोव्हेंबरला राज्यात मी शिवसेना-भाजपा सत्तेत असतांना पोटनिवडणूकीत जिंकलो होतो. त्या निवडणूकीचे कार्यालय देखील त्याचं गोवावाला कंपाऊंड बिल्डींगमध्ये होते. आम्ही तिथे भाडेकरु होतो. त्यानंतर मुनिरा यांनी त्या भाड्याने दिलेल्या गोडाऊनचा मालक हक्क द्यायचा असल्याचे आम्हाला सांगितले. आम्ही त्यांच्याकडून गोडाऊनची मालकी घेतली. या दरम्यान पॉवर ऑफ अॅटर्नी होल्डर सलीम पटेल यांच्याशी आम्ही खरेदी केली त्याचे सर्व कागदपत्रे उपलब्ध आहेत. त्याची जी किंमत होती ती आम्ही दिली. देवेंद्र फडणवीस यांनी वाढवून चढवून बॉम्ब ब्लास्ट करण्याचा प्रयत्न केला. सरदार शाहवली खान यांचे नाव घेण्याचा प्रयत्न केला. मात्र देवेंद्रजी यांना त्यांचे माहितीस्त्रोत हे सांगू शकले नाहीत की त्याच गोवावाला कंपाऊंडमध्ये सरदार  शाहवली वली खान यांचे घर आहे. कोणत्याही दबावात किंवा अंडरवर्ल्डशी सबंध असलेल्या लोकांकडून आम्ही ही मालमत्ता खरेदी केली नाही.” 

अंडरवर्ल्डचा हायड्रोजन बॉम्ब मुंबईत फोडणार

“देवेंद्र फडणवीस तुम्ही बॉम्ब फोडणार असल्याचे म्हटले होते. मात्र हा बॉम्ब नव्हता. नवाब मलिक उद्या सकाळी १० वाजता अंडरवर्ल्डचा हायड्रोजन बॉम्ब मुंबईत फोडणार आणि देशाला सांगणार की देवेंद्र फडणवीस यांनी कशाप्रकारे अंडरवर्ल्डच्या सहाऱ्याने शहराला बंदी केले होते.” असा इशारा देखील मलिक यांनी फडणवीस यांना दिला. 

काय म्हणाले होते फडणवीस ?

देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्यावर अंडरवर्ल्डशी संबंधित व्यक्ती, मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीकडून साडेतीन कोटींची जमीन फक्त २० लाखांत खरेदी केल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. तसेच, सलीम पटेल कोण होता, त्यानं तुम्हाला इतक्या स्वस्तात जमीन का विकली? असे सवाल देखील नवाब मलिक यांना केले आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Minister nawab malik suggestive tweet after serious allegations of devendra fadnavis srk