लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

मुंबई : गेल्या पाच वर्षांपासून बीड जिल्ह्याच्या राजकारणापासून मी दूर होते. जिल्ह्यात कार्यरत असलेले अधिकारी तत्कालीन मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांनी नेमलेले आहेत. मग, बीड जिल्ह्यात एकाच जातीचे अधिकारी मी नेमले, असे आरोप माझ्यावर कसे काय होऊ शकतात, असा प्रश्न पर्यावरण आणि हवामान बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी केला.

बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरण सध्या चर्चेत आहे. या हत्या प्रकरणाला वंजारी आणि मराठा जातीमधील वैमनस्याचा संबंध काहींनी जोडला आहे. बीड जिल्ह्यात तलाठी ते जिल्हाधिकारी सर्व वंजारी जातीचे अधिकारी कसे, असा सवाल उपस्थित केले जात आहेत. मुंडे यांनी मंगळवारी मंत्रालयात मुंबईतील हवा प्रदूषणासंदर्भात बैठक आयोजित केली होती. त्यावेळी माध्यमांशी बोलताना मुंडे म्हणाल्या की, संतोष देशमुख हत्या प्रकरणात कोण आहे, हे मला माहिती नाही. आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे, हे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. संतोष देशमुख हा माझा कार्यकर्ता होता. त्याच्या कुटुंबीयांना न्याय मिळाला पाहिजे, अशी आपली भूमिका आहे.

आणखी वाचा-दाभोलकर हत्या प्रकरण : आरोपींच्या सुटकेविरोधातील दाभोलकर कुटुंबीयांच्या अपिलाला आक्षेप

‘बीडचे राजकीय पर्यावरण सुधारेल’

बीड प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. राजीनाम्यासंदर्भात त्यांच्या पक्षाचे नेते आणि सर्वोच्च नेते उत्तरे देऊ शकतात. बीड जिल्ह्याचे वातावरण बिघडले आहे हे बोलताना मन जड होते. अजित पवार आणि मुख्यमंत्री जिल्ह्याचे पर्यावरण सुधारू शकतील. बीडचे राजकीय पर्यावरण लवकरच बदलेल, असा मला विश्वास आहे. या कामात माझी त्यांना साथ असेल.

‘दमानियांनी जातीविषावर बोलताना काळजी घ्यावी’

संतोष देशमुख हत्येप्रकरणी माहिती समोर आणणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना कोणी धमकावत असेल तर त्यांनी तक्रार दाखल केली पाहिजे. त्यांना धमकावणारे माझे कार्यकर्ते नाहीत. पण, दमानिया यांनी कोणत्याही जातीविषयी बोलताना काळजी घ्यावी.

Story img Loader