मुंबई : ठाणेकर आणि लगतच्या जिल्ह्यांसाठी ९०० खाटांचे अत्याधुनिक जिल्हा शासकीय रुग्णालय लवकरच नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहे. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी नवीन ठाणे जिल्हा रुग्णालयाच्या बांधकाम स्थळाची पाहणी केली. या वेळी आरोग्य मंत्री म्हणाले की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट पूर्णत्वास आला असून, ठाणे शहर व जिल्हा ,रायगड,पालघर व सीमावर्ती गुजरात मधील रुग्णांना याचा लाभ होईल. यावेळी आरोग्य मंत्र्यांनी रुग्णालयातील विविध विभागांची पाहणी केली. भविष्यात येथे वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याची योजना आहे.
माध्यमांशी बोलताना आरोग्य मंत्री आबिटकर म्हणाले, रुग्णालयात एएनएम, जीएनएमसह बी.एससी. नर्सिंग कॉलेज सुरू करण्याची, तसेच भविष्यात मेडिकल कॉलेज स्थापन करण्यात येणार आहे. ठाणे जिल्हा रुग्णालय हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे आणि अत्याधुनिक शासकीय रुग्णालय ठरणार असून यामुळे केवळ ठाणेच नव्हे, तर पालघर, रायगड तसेच आसपासच्या जिल्ह्यांतील रुग्णांनाही गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा मिळेल.या पाहणीदरम्यान आरोग्य मंत्री आबिटकर बाह्यरुग्ण विभाग, अपघात विभाग, एमआरआय, सोनोग्राफी, सीटी स्कॅन, क्ष-किरण, मॅमोग्राफी, आंतररुग्ण विभाग, प्रसूती विभाग, मॉड्युलर शस्त्रक्रिया गृह, हेलीपॅड, वाहनतळ इमारत तसेच परिचारिका प्रशिक्षण केंद्र आणि वसतीगृह इमारतींची पाहणी केली. एकूण ९२,५३९ चौ.मी. क्षेत्रफळावर उभारण्यात आलेल्या या रुग्णालयाचे ८७ टक्के बांधकाम पूर्ण झाले असून उर्वरित कामे युद्धपातळीवर सुरू आहेत.
ठाणे जिल्हा रुग्णालय प्रकल्पांतर्गत ५०० खाटांचे सामान्य जिल्हा रुग्णालय, २०० खाटांचे महिला व बाल रुग्णालय, २०० खाटांचे सुपरस्पेशालिटी संदर्भ रुग्णालय, परिचारिका प्रशिक्षण केंद्र व वसतीगृह आणि वाहनतळ इमारतीचा समावेश आहे. या रुग्णालयात मातामृत्यू आणि बालमृत्यू कमी करण्यासाठी अत्याधुनिक आयसीयू, एनआयसीयू, एसएनसीयू युनिट्ससह गरजू रुग्णांसाठी टीसीयू, एनआरसी, तसेच रक्तविकार, मानसिक आरोग्य आणि इतर विशेष विभाग उपलब्ध असणार आहेत.२०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी विभागात हृदयरोगासाठी कॅथलॅब, न्यूरोलॉजी, ऑन्कोलॉजी आणि ऑनकोसर्जरी, नेफ्रोलॉजी व डायलेसिस सुविधा उपलब्ध असणार आहेत. बालकांसाठी स्वतंत्र डायलिसिस युनिट, तसेच एमआरआय, सीटी स्कॅन, केमोथेरपी आणि रेडिएशन थेरपीसारख्या अत्याधुनिक उपचार सुविधांचा समावेश आहे.
ठाणे जिल्हा मुंबईलगत असल्यामुळे येथे मुंबई-अहमदाबाद, मुंबई-आग्रा, मुंबई-गोवा आणि समृद्धी महामार्गांवरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. या महामार्गांवरील अपघातग्रस्त रुग्णांना तातडीने उपचार देण्यासाठी हे रुग्णालय मोठा आधार ठरणार आहे. या प्रकल्पाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही ही महत्त्वाकांक्षी संकल्पना असून, त्यांनी संबंधित विभागांना म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण व आरोग्य विभाग यांनी सर्वांनी समन्वयाने सर्व कामे तातडीने पूर्ण करून रुग्णालय लवकरात लवकर कार्यान्वित करण्याचे निर्देश दिले आहेत. या वेळी आरोग्यमंत्र्यां समवेत सहसंचालक डॉ. सुनिता गोल्हाईत,उपसंचालक डॉ. अशोक नांदापुरकर, ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलाश पवार आदी उपस्थित होते.
