मुंबई: तोंडी आदेश आणि उसनवारीवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना मुख्य सचिवांच्या आदेशानंतर मंत्री कार्यालय सोडावे लागले. मात्र यामुळे मंत्री कार्यालयात अधिकारी संख्या घटल्याने मंत्र्यांकडून प्रतिनियुक्तीवरील अधिकारी संख्या वाढविण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. मात्र या मागणीला राजपत्रित अधिकारी महासंघाने विरोध दर्शवला असून अधिकाऱ्यांची आवश्यकता दुष्काळग्रस्त भागात असल्याने मंत्री कार्यालयातील अधिकाऱ्यांची संख्या वाढवू नये अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

राजपत्रित अधिकारी महासंघाने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दुष्काळग्रस्त ३५८ तालुक्यांत नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी क्षेत्रिय पातळीवर सरकारी कर्मचारी रात्रंदिवस झटत आहेत. त्यासाठी मोठ्या प्रमाणात कर्मचारी फिल्डवर उपलब्ध असणे अत्यावश्यक आहे. त्याकडे दूर्लक्ष करुन मंत्री आस्थापनेवर अधिकारी वाढविण्याची मंत्र्यांची मागणी अत्यंत अयोग्य व अनाठायी असल्याचे म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांनीच मंत्री अस्थापनेवरील अतिरिक्त अधिकाऱ्यांना मूळ विभागात परतण्याचे अन्यथा वेतन रोखण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे अनेक मंत्र्यांच्या कार्यालयातली कर्मचाऱ्यांची गर्दी कमी झाली त्यामुळे सर्वसामान्य माणूस थेट माननीय मंत्री महोदयांना भेटू लागल्याचे म्हटले आहेत.

१२ एप्रिल २००४ च्या शासन निर्णयान्वये मंत्री तसेच राज्य मंत्री यांच्या कार्यालयाचा आकृतीबंध अनुक्रमे १५ व १३ अधिकारी संख्या असा सुनिश्चित करण्यात आला होता. त्यावेळी शासनाचे कामकाज पूर्णपणे कागदावर म्हणजेच फायलींच्या माध्यमातून चालत असे. मात्र त्यानंतर देशात डिजिटल क्रांती झाली. सरकार तसेच सरकारी कर्मचाऱ्यांनी या डिजिटल क्रांतीचं स्वागत करत नवीन तंत्रज्ञान अवगत करुन घेत राज्यातील दूर्गम भागातल्या सर्वच जनसामान्यांचे प्रश्न अधिक अचूक, वेगाने कार्यक्षमपणे सोडविण्यासाठी संगणकाचा मोठ्या प्रमाणात वापर सुरू केला त्यामुळे शासनाला विविध योजनांची आखणी आणि अंमलबजावणी अधिक सुलभ व सुकर झाले. पर्यायाने सरकारी कर्मचाऱ्यांची विविध विभागातील ५०% पेक्षा जास्त पदे सरकारने कर्मचारी संघटनांना विश्वासात न घेता व्यपगत केली. यामुळे कर्मचाऱ्यांच्या डोक्यावर कामाचा मोठा बोजा कायमस्वरुपी बसला. विविध विभागांमध्ये निवृत्तीनंतर रिक्त होणारी पदे भरती न केल्याने तसेच प्रतिनियुक्ति, उसनवारी वर मोक्याच्या किंवा लाभाच्या ठिकाणी नियुक्ति मिळवून घेणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांमुळे मूळ विभागात हाताच्या बोटावर इतकेच काम करणारे कर्मचारी शिल्लक राहिल्याची बाब महासंघाने पत्रात नमूद केली आहे.

सामान्य प्रशासन विभागाने डिसेंबर २००७ मध्ये मंत्री तसेच राज्यमंत्री आस्थापनेवर आकृतीबंधाव्यतिरिक्त अतिरिक्त कर्मचारी वृंद मंजूर करण्यात येऊ नयेत तसेच कार्यालयात करिता जागा नसल्याने अतिरिक्त जागा मंजूर न करण्याचा आदेश काढला. १४ जानेवारी २०२५ च्या मंत्री कार्यालय आस्थापना आकृतीबंध यानुसार माननीय मुख्यमंत्री यांच्या कार्यालयातील आस्थापनेवर एकूण १६४ तर माननीय उपमुख्यमंत्री यांच्या आस्थापनेवर ७२ म्हणजे दोन उपमुख्यमंत्री पदांच्या आस्थापने वर एकूण १४४ अधिकारी कर्मचारी सध्या नियुक्त आहेत. त्याचबरोबर प्रत्येक माननीय मंत्री तसेच राज्यमंत्री यांच्या आस्थापनेवर आता सध्या अनुक्रमे १६ व १४ पदे मंजूर करण्यात आलेली आहेत. मात्र हे अधिकारी कर्मचारी कमी आहेत त्यासाठी अतिरिक्त अधिकारी/ कर्मचारी नियुक्त करण्याबाबत मागणी होत असून कर्मचाऱ्यांची लाखो पदे रिक्त असतांना अशारीतीने अनावश्यक नियुक्त्या करण्यात येऊ नयेत अशी मागणी अधिकारी महासंघाने केली आहे.