मुलीला लसीकरणासाठी अमेरिकेत पाठवा; दाम्पत्याची थेट कोर्टात धाव!

अमेरिकेत १२ वर्षावरील सर्वांना लस घेण्याची परवानगी

सौजन्य- इंडियन एक्स्प्रेस

करोनारुपी राक्षसाने संपूर्ण जगाला आपल्या विळख्यात घेतलं आहे. त्यामुळे लॉकडाउन, मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत त्याला दूर ठेवलं जात आहे. असं असलं तरी करोनाला मुळापासून संपवण्यासाठी लस हे सर्वात प्रभावी हत्यार आहे. यासाठी संपूर्ण जगाने लसीकरणावर जोर दिला आहे. भारतातही १ मे २०२१ पासून १८ वर्षांवरील सर्वांचं लसीकरण करण्यासाठी आदेश पारीत करण्यात आला आहे. तर अमेरिकेत १२ वर्षांवरील सर्वांचं लसीकरण करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. हीच बाब एका दाम्पत्याने कोर्टासमोर मांडली. अल्पवयीन मुलीला अमेरिकेत लसीकरणासाठी जाण्याची परवानगी द्यावी अशी मागणी त्यांनी याचिकेद्वारे केली आहे.

सौम्या ठक्करचा जन्म अमेरिकेत झाला आहे. त्यामुळे तिथे जन्म झाल्याने तिला अमेरिकेचं नागरिकत्व मिळालं आहे. त्यामुळे तिच्या लसीकरणासाठी ठक्कर दाम्पत्याने कोर्टात धाव घेत तिला अमेरिकेत पाठवण्याची विनंती केली आहे. मात्र तिचं वय १४ वर्षाखाली असल्याने तिच्यासोबत पालक असणं गरजेचं आहे. यासाठी तिच्यासोबत जाण्याची परवानगी दाम्पत्याने मागितली आहे. सौम्या आता अकरावीत असून आयबी स्कूलची विद्यार्थिनी आहे. तिचं शैक्षणिक वर्ष १ जुलैपासून सुरु होणार आहे. अमेरिकेत लसीचे दोन डोस घेण्यासाठी २१ दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. त्यामुळे तिथे २१ दिवस राहणं गरजेचं आहे. १ जुलैपूर्वी तिचं लसीकरण पूर्ण होईल असं पालकांनी नेमलेल्या वकिलाने कोर्टासमोर सांगितलं आहे. योग्य उपचार मिळवणं हा सौम्याचा अधिकार असल्याचंही पालकांनी सुनावणीदरम्यान सांगितलं. करोनाची दुसरी लाट आल्यानंतर भारतातून अमेरिकेत येणाऱ्या नागरिकांना प्रवास बंदी आहे. मात्र त्यात अमेरिकन नागरिकांना वगळण्यात आलं आहे.

मुंबईस्थित हाफकिन बायोफार्माला कोव्हॅक्सिन लस उत्पादनासाठी १५९ कोटींचं अनुदान!

सौम्याच्या पालकांनी तिच्यासोबत जाण्याची तयारी देखील केली होती. मात्र सौम्याचे आजी आजोबा वयोवृद्ध असल्याने त्यांना सोडून जाणं कठीण आहे. तिच्या आजी आजोबांना करोना झाला होता आणि त्यातून ते नुकतेच बरे झाले आहेत. त्यामुळे त्यांनी तिच्यासोबत जाण्याऐवजी मावशीला पाठवण्याचं ठरवलं आहे. याप्रकरणी न्यायमूर्ती एसएस शिंदे आणि न्यायमूर्ती अभय अहुजा यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. या सुनावणीनंतर त्यांनी राज्य सरकारला एका आठवड्यात उत्तर देण्यास सांगितलं आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी एका आठवड्याने होणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Minor daughter send to us for vaccination couple appeal in high court rmt