मुंबई : १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर १६ वर्षाच्या मुलाने बलात्कार करून त्याची चित्रफित तयार करून ती समाज माध्यमांवर प्रसारीत (व्हायरल) केली आहे. याप्रकरणी मुलाला ताब्यात घेण्यात आले असून चित्रफित व्हायरल करणाऱ्या अन्य अज्ञात इसमांविरोधात सांताक्रुझ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित मुलगी मुंबईतील एका नामांकित शाळेत शिक्षण घेत आहे. ती सांताक्रुझ येथे राहते. मागील वर्षी १ जानेवारी २०२४ रोजी तिचा १६ वर्षांच्या मित्राने घरी नववर्ष स्वागताच्या पार्टीसाठी बोलावले. त्यानुसार ती सांताक्रुझ येथील मित्राच्या घरी गेली. त्यावेळी तिच्या मित्राने तिच्या अजाणतेपणाचा गैरफायदा घेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि त्याची चित्रफित आपल्या मोबाईलमध्ये तयार केली. ती समाजमाध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी देऊन तिच्यावर वारंवार बलात्कार करत होता. त्यानंतर त्याने आपल्या अन्य एका मित्राला समाज माध्यमांवरून पाठवली होती.
दरम्यान, जून महिन्यात या मुलीची अश्लील चित्रफित प्रसारित करण्यात आली. पीडित मुलगी रहात असलेल्या परिसरात तसेच तिच्या परिचितांपर्यंत ती चित्रफित पोहोचली होती. या प्रकारामुळे मुलीला प्रचंड मानसिक धक्का बसला. अखेर तिने पालकांना घडलेला प्रकार सांगितला. यानंतर तिच्या वडिलांनी सांताक्रूझ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या प्रकरणी सांताक्रुझ पोलिसांनी १६ वर्षांचा मित्रासह अश्लील चित्रफित वायरल करणाऱ्यांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ६५ (१), ७७, ३५६, बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायदा २०१२ (पोक्सो) च्या कलम ४, ८, १२ तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमाच्या कलम ६७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपी विधीसंघर्षित बालकला ताब्यात घेण्यात आले असून त्याची रवानगी डोंगरी येथील बालसुधारगृहात करण्यात आली आहे.