पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांना किती अधिकार आहेत, राज्यमंत्र्यांना किती अधिकार व कितीजण धोरण ठरवत आहेत, हे देशातील राजकीय लोकांना माहीत आहे. त्यामुळे ज्या मंत्र्यांना अधिकार नाही ते फक्त बोलण्यासाठी मंत्री झालेत. त्यांच्या बोलण्याला गंभीरतेने घेण्याची गरज नाही, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपाचे मंत्री रावसाहेब दानवे यांना लगावला आहे.

१५ ऑगस्टपासून रेल्वे सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्यानंतर तसा प्रस्ताव रेल्वेमंत्रालयाकडे आला नाही, अशी प्रतिक्रीया रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली होती. त्यावर पत्रकारांनी विचारले असता नवाब मलिक यांनी प्रहार केला आहे.

हेही वाचा – “शिवसेनेत असताना हॉकी असायची”, भुजबळांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले..!

“रावसाहेब दानवे हे रेल्वे राज्यमंत्री आहेत त्यामुळे त्यांना किती अधिकार आहेत, हे मला माहीत नाही. मात्र बोलून कामे होत नसतात. मुंबईतील अत्यावश्यक सेवेतील लोकांसाठी रेल्वे सुरू आहे. त्यात ज्यांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत त्यांना १५ ऑगस्टपासून प्रवेश देण्याची माहिती रेल्वेला राज्य सरकारकडून जाणार आहेच. ८ ऑगस्टला मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आहे. त्यामुळे तो प्रस्ताव जाणारच आहे”, असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.