नवाब मलिक यांचा पलटवार

मुंबई :  नारायण राणे घाबरल्याने त्यांनी भाजप प्रवेश केला. त्यांना काही बक्षीस मिळाले नाही म्हणून ते काहीही बोलतात अशी टीका राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.

महाराष्ट्र सरकार टिकणार नाही असे वारंवार राणे म्हणायचे. याबाबत आधी पंधरा दिवस, नंतर दोन महिने आणि आता वर्षभर अशी तारीख पे तारीख सुरू होती. राज्य सरकार भक्कम आहे. राणे तुमच्यासारखे भित्रे मंत्री आता राहिलेले नाहीत. जे भित्रे होते ते गेले. आता भाजप यंत्रणेचा वापर करून लोकांच्या मनात भीती निर्माण करत असेल तर आम्ही घाबरणार नाही.

जे घाबरत होते, त्यांनी पक्ष सोडला. त्यांना बक्षीसही मिळाले असेल. पण हे सरकार पाच वर्षे टिकेल आणि २५ वर्षे हेच सरकार राहील, हे मुख्यमंत्र्यांनी आधीच जाहीर केले होते. जे भित्रे होते ते तिकडे गेले. त्यांना झोप येते आणि आम्ही लोकांची झोप उडवतो, असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे.

नारायण राणेंनी पत्रकार परिषदेत केलेल्या टीकेला नवाब मलिक यांनी उत्तर दिले.

मलिक यांना राष्ट्रवादीने सोडून दिले आहे. त्यांच्या चोराच्या उलट्या बोंबा आहेत. त्यांच्या जावयाकडे काय मिळाले हे सर्वांना माहीत आहे. तरीही ते बोलत आहेत. आघाडीच्या अनेक मंत्र्यांना अटक होणार आहे. त्याची चिंता करा, डायलॉगबाजी करू नका, असे नारायण राणे यांनी म्हटले होते. त्यावर मलिक यांनी वरील प्रतिक्रिया दिली.