मुंबई : उच्च शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांकरिता अल्पसंख्याक विकास विभागामार्फत  चालविल्या जाणाऱ्या वसतिगृहांमधील विद्यार्थ्यांना आहाराकरिता रोख रक्कम देण्यात येणार आहे. ही रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होणार आहे.

महापालिका तसेच विभागीय शहरातील वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा साडेतीन तर जिल्हा व तालुकास्तरावरील वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा तीन हजार रुपये देण्यात येणार आहे, अशी माहिती अल्पसंख्याक विकास विभागाचे मंत्री नवाब मलिक यांनी दिली. चालू शैक्षणिक वर्षांपासून (२०२१-२२) या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येईल. राज्यातील सर्व जिल्ह्य़ांमध्ये अल्पसंख्याक मुस्लीम, जैन, बौद्ध, ख्रिश्चन, शीख, ज्यू व पारशी समाजातील उच्च शिक्षण घेणाऱ्या मुला-मुलींसाठी शासकीय वसतिगृह योजना राबविण्यात येत आहे. अनेक विद्यार्थ्यांना कौटुंबिक आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने भोजन व इतर खर्च करणे शक्य होत नाही.