मुंबई : आपापल्या जातगटाच्या भल्यासाठी ‘प्रशिक्षण आणि संशोधन संस्था’ स्थापन करण्याचे शिंदे सरकारच्या कार्यकाळात पेव फुटले हाेते. त्यादम्यान अजित पवार यांनी मुस्लीम आमदारांच्या मागणीनंतर ‘अल्पसंख्याक प्रशिक्षण व संशोधन संस्था’ (मार्टी) व स्वतंत्र अल्पसंख्याक आयुक्तालय स्थापन करण्यात पुढाकार घेतला. अल्पसंख्याकासाठीच्या या संस्थांची कामे प्राथमिक टप्प्यात असताना अजित पवार यांचे निधन झाल्याने या संस्थांचा कारभार आता रखडण्याची भीती आहे.
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मातंग, बंजारा, मराठा, माळी, ब्राह्मण या जातघटकांसाठी राज्यात संशोधन व प्रशिक्षण संस्था स्थापन झाल्या आहेत. दरम्यान मुस्लीम आमदारांनीही अजित पवारांकडे मागणी केली. वर्ष २०२५-२५ च्या अर्थसंकल्पात अजित पवारांनी मार्टीची घोषणा केली. राज्यात अल्पसंख्याक समाजासाठीच्या योजना जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत राबवल्या जात होत्या. त्यामुळे त्यांची प्रभावी अंमलबजावणी होत नसे. ही बाब अजित पवारांच्या लक्षात आणून देताच त्यांनी स्वतंत्र अल्पसंख्याक आयुक्तालय सुद्धा स्थापन केले.
‘मार्टी’ संस्थेचे मुख्य कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे आहे. या संस्थेचा स्वतंत्र इमारत व पदभरतीचा प्रश्न प्रलंबित आहे. अजित पवार यांच्या अकाली निधनाने ‘मार्टी’चे भविष्य अंधातरी राहिले आहे.
राष्ट्रवादी दुभंगल्यानंतर झालेल्या १५ व्या विधानसभेसाठीच्या निवडणुकीत अजित पवार यांच्या पक्षाने सर्वधिक मुस्लीम उमेदवार निवडणुकीत उतरवले हाेते. विधानसभेत दोन आणि विधान परिषदेत एक असे राष्ट्रवादीचे आज विधिमंडळात तीन मु्स्लीम आमदार आहेत.
नुकत्याच झालेल्या महानगरपालिका निवडणुकीतही मुस्लीम उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवण्यात अजित पवारांची राष्ट्रवादी अग्रभागी होती. मुंबईत राज्यस्तरीय पक्षांमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीने ९४ पैकी २३ (२४ टक्के) उमेदवार मुस्लीम दिले होते. राष्ट्रवादीचे माजी आमदार नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत राष्ट्रवादीबरोबर युती करण्यास भाजपने नकार दिला, तरी अजित पवार यांनी मलिकच मुंबईचे नेतृत्व करतील असे ठासून सांगितले.
काँग्रेसपेक्षा आज राष्ट्रवादीचा अल्पसंख्याक विभाग मजबूत आहे. राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात सर्वाधिक मुस्लीम कार्यकर्त्यांची वर्दळ असते. सर्वपक्षीम मुस्लीम आमदारांना त्यांच्या मतदारसंघातील रखडलेली कामे व विकास निधीसाठी अजित पवार सदैव उपलब्ध होते. एमआयएम, समाजवादी व काँग्रेससोबत राज्यातील बहुतांश मुस्लीम समाज असला तरी राष्ट्रवादी दुभंगल्यानंतर अजित पवार यांच्याकडे मुस्लीम समाज मोठ्या संख्येने वळला होता व आशेने पाहात होता.
निर्भयपणाचा विश्वास :
‘तुमचा भाऊ अजित पवार तुमच्या सोबत आहे, जो कोणी मुस्लिम बांधवांना डोळे दाखवेल, दोन गटात वाद निर्माण करेल, तो कोणीही असला, तरी त्याला सोडणार नाही’, या शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईतील इस्लाम जिमखाना येथे मार्चमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने आयोजित केलेल्या ‘इफ्तार पार्टी’त आश्वसीत केले होते. अजित पवार यांच्या या भूमिकेचे मुस्लीम समाजातून स्वागत झाले होते.

