मुंबई : मिरा-भाईंदर – वसई-विरार प्रवास रस्ते मार्गे अवघ्या काही मिनिटांत करता यावा यासाठी मिरा-भाईंदर ते वसई-विरार मेट्रो १३ मार्गिकेअंतर्गत नायगाव खाडीवर दुमजली खाडीपूल बांधण्याचा निर्णय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) घेतला आहे. त्यानुसार प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीत मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे येत्या काही वर्षांनी मिरा-भाईंदर ते वसई-विरार प्रवास मेट्रोने आणि वाहनाने काही मिनिटांतच करता येणार आहे. या दुमजली खाडीपुलाच्या वरील स्तरावरून मेट्रो, तर खालच्या स्तरावरून वाहने धावणार आहेत.
दहिसर ते मिरा-भाईंदर मेट्रो ९ मार्गिकेचा विस्तार मेट्रो १३ मार्गिकेच्या माध्यमातून मिरा-भाईंदर ते वसई-विरारपर्यंत केला जाणार आहे. त्यानुसार २५.०३ किमीचीही मेट्रो १३ मार्गिका असणार असून या मार्गिकेतील २१.७८ किमीची मार्गिका उन्नत, तर ३.२५ किमी मार्गिका भुयारी असणार आहे. १६ मेट्रो स्थानकांचा समावेश असलेल्या या मार्गिकेच्या सुधारित आराखड्याला, संरेखनास आणि खर्चास काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आला होता. तर मेट्रो १३ मार्गिकेअंतर्गत नायगाव खाडीवर दुमजली खाडीपूल बांधण्याचाही निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. त्यानुसार मेट्रो १३ मार्गिकेच्या प्रस्तावासह दुमजली खाडीपुलाच्या प्रस्तावाचाही त्यात समावेश होता. त्यानुसार दुमजली खाडीपुलाच्या प्रस्तावासही पायाभूत सुविधा समितीने मान्यता दिली आहे. त्यामुळे आता या दुमजली खाडीपुलाच्या बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे. तेव्हा आता लवकरच या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीस सुरुवात होणार आहे.
मेट्रो १३ अंतर्गत पुलाच्या कामाला मंजुरी
मिरा-भाईंदरवरून वसई-विरारला जाण्यासाठी वाहनांना मोठा वळसा घालावा लागतो. या प्रवासासाठी किमान ४५ ते ६० मिनिटे लागतात. त्यामुळे नायगाव (भाईंदर) खाडीवर पूल उभारण्याची मागणी मागील कित्येक वर्षांपासून स्थानिकांकडून होत होती. मात्र हा खाडीपूल काही मार्गी लागत नव्हता. मात्र शेवटी एमएमआरडीएने मेट्रो १३ अंतर्गत नायगाव खाडीवर दुमजली पूल उभारण्याचा निर्णय घेतला. मेट्रो १३ मार्गिका नायगाव खाडीवरून जाणार असल्याने मेट्रोसह वाहनेही खाडीवरून नेण्यासाठी दुमजली पूल बांधण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार यासंबंधीच्या प्रस्तावास एमएमआरडीएच्या १६० व्या बैठकीत मान्यता घेऊन हा प्रस्ताव राज्य सरकारकडे मान्यतेसाठी पाठवला होता. त्यास आता सरकारची मान्यता मिळाली आहे.
मिरा-भाईंदर ते वसई-विरार प्रवास अधिक आरामदायी
प्रस्तावानुसार हा दुमजली खाडी पूल ४.९८ किमी लांबीचा व २८.६० मीटर रुंदीचा आहे. वाहनांसाठीचा पूल सहापदरी असणार असून खालच्या स्तरावरून वाहने धावतील, तर वरच्या स्तरावरून मेट्रो धावेल. या दुमजली खाडी पुलासाठी सुमारे १,६०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या पुलामुळे मिरा-भाईंदर ते वसई-विरार हे अंतर अवघ्या काही मिनिटांत पार करता येणार आहे. त्यामुळे वाहनचालक व प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. मेट्रोचाही पर्याय उपलब्ध होणार असल्याने मिरा-भाईंदर ते वसई-विरार प्रवास अधिक आरामदायी होणार आहे.
