मुंबई : मीरा-भाईंदर ते वसई-विरार मेट्रो मार्ग-१३साठी १७ हजार ७२५ कोटींच्या खर्चाच सरकारकडून वर्तविण्यात आला आहे. हा खर्च वाढल्यास त्याची जबाबदारी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणावर (एमएमआरडीए) सोपविण्यात आली आहे. या मेट्रो मार्गिकेच्या दोन्ही बाजूंना ५०० मीटरपर्यंतच्या परिसरात जो अतिरिक्त चटई क्षेत्रफळाच्या माध्यमातून हा निधी उभारण्याची मुभा एमएमआरडीएला देण्यात आली अहे.
सरकारने मेट्रो १३ या प्रकल्पाच्या मंजुरी संदर्भातील शासन निर्णय नगरविकास विभागाकडून जारी करण्यात आला आहे.
यानुसार आर्थिक जबाबदारी, खर्चवाढीवर नियंत्रण व भविष्यातील महसूल उभारणीबाबत एमएमआरडीएला अटी घालण्यात आल्या आहेत. मेट्रो-१३ प्रकल्पाचा खर्च १७,७२४.९९ कोटी रुपये निश्चित करण्यात आला असला तरी महागाई, परकीय चलनातील बदल, प्रकल्पाची व्याप्ती तसेच प्रकल्पाला विलंब होऊन खर्च वाढल्यात ते खर्च एमएमआरडीएन उचलायचा आहे. भूसंपादन किंवा पुनर्विकास प्रक्रियेतील विलंबामुळे प्रकल्पाचा खर्च वाढू नये, याची जबाबदारीही एमएमआरडीएनेच पार पाडायची आहे.
प्रकल्पाच्या मार्गात किंवा स्थानकांच्या रचनेत किरकोळ बदल करण्याचे अधिकार एमएमआरडीए आयुक्तांना असून खर्चात वाढ करणारा कोणताही बदल करण्यापूर्वी राज्य सरकारची मंजुरी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. अतिरिक्त एफएसआयच्या माध्यमातून निधी उभारण्यास परवानगी देतानाच विकास शुल्कात १०० टक्क्यांपर्यंत वाढ, महत्त्वाकांक्षी शहरी वाहतूक प्रकल्पांसाठी मुद्रांक शुल्कावर एक टक्का अधिभार, त्याचप्रमाणे हस्तांतरित जमिनींचा व्यावसायिक विकास आदी माध्यमांतूनही निधी उभारण्याची मुभा देण्यात आली आहे.
२०३१ पर्यंत मेट्रो-१३ सुरू करणार
राज्य सरकारने एमएमआरडीएला प्रकल्पाच्या अंमलबजावणीचा कालबद्ध कार्यक्रम शासनाकडे १५ दिवसांत सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
१७,७२४.९९ कोटी रुपयांच्या प्रकल्पासाठी एमएमआरडीएचा हिस्सा ५९३.६३ कोटी रुपये, राज्य शासनाचे अधीनस्थ कर्ज २,८१०.३६ कोटी रुपये आणि बाह्य कर्ज १३,२९३.७४ कोटी रुपये असे खर्चाचे नियोजन करण्यात आले आहे. बाह्यकर्ज फेडण्याची जबाबदारी एमएमआरडीएवर सोपविण्यात आली आहे. मेट्रो-१३ची लांबी २५.०३१ किलोमीटर असून १६ स्थानके असतील. यापैकी २१.७८ किलोमीटर मार्ग उन्नत आणि ३.२५ किलोमीटर भूमिगत असेल. वसई खाडीवरील ४.९२ किलोमीटर लांबीचा सहा पदरी रस्ता-सह-मेट्रो पूल उभारण्यात येणार आहेत. प्रकल्पाची अंमलबजावणी २०२६ ते २०३१ या कालावधीत करण्याचे नियोजन आहे.
