मुंबई : शिवाजी चौक, मिरारोड – गायमुख मेट्रो १० मार्गिकेच्या कामासाठी निविदा प्रसिद्ध करण्यासाठी याआधी दोन तारखा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिल्या होत्या. मात्र अद्याप मेट्रो १० मार्गिकेच्या कामासाठी निविदा प्रसिद्ध झालेली नाही. आता आठवड्याभरात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) निविदा प्रसिद्ध केली जाणार असल्याची माहिती सरनाईक यांनी शुक्रवारी एका पत्रकार परिषदेत दिली. तर निविदा प्रक्रिया पूर्ण करून येत्या सहा महिन्यांत मार्गिकेच्या बांधकामास सुरुवात होईल, असेही ते यावेळी म्हणाले.
९.२ किमीची मार्गिका
एमएमआरडीएच्या ३३७ किमीच्या मेट्रो प्रकल्पातील शिवाजी चौक, मिरारोड – गायमुख मार्गिका ९.२ किमीची आहे. या मार्गिकेसाठी अंदाजे ८ हजार ५५३ कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. मिरारोडवरून ठाण्याला अतिजलद पोहोचता यावे आणि घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडी दूर व्हावी यासाठी ही मार्गिका हाती घेण्यात आली आहे. वडाळा – कासारवडवली – गायमुख मेट्रो ४, मेट्रो ४ अ मार्गिकेचा आणि दहिसर – मिरा – भाईंदर मेट्रो ९ मार्गिकेचा विस्तार मेट्रो १० मार्गिकेच्या माध्यमातून केला जाणार आहे.
त्यामुळे ही मार्गिका अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. ही मेट्रो मार्गिका अद्याप कागदावरच आहे. ही मेट्रो मार्गिका मार्गी लावावी यासाठी सरनाईक एमएमआरडीएकडे सातत्याने पाठपुरावा करत आहेत. त्यांनी शुक्रवारी एमएमआरडीएच्या वांद्रे येथील मुख्यालयात अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत आठवड्याभरात मेट्रो १० मार्गिकेच्या कामासाठी निविदा काढण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सरनाईक यांनी बैठकीनंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
रस्त्याचे रुंदीकरणही एमएमआरडीएकडे
मेट्रो १० मार्गिकेसाठी ८ हजार ५५३ कोटी खर्च अपेक्षित आहे. गायमुख – घोडबंदर रस्त्यावरून ही मेट्रो जात असून ५.५ किमीचा हा रस्ता अरुंद आहे. हा रस्ता ३० मीटरवरून ६० मीटर करणे आवश्यक आहे. मेट्रोच्या कामाअंतर्गतच रस्त्याचे रुंदीकरण करण्याचीही जबाबदारी एमएमआरडीएने घेतल्याचेही सरनाईक यांनी सांगितले.
या रस्ता रुंदीकरणासाठी अंदाजे १२०० कोटी खर्च अपेक्षित असून तो खर्च एमएमआरडीए करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, मेट्रो १० मार्गिकेच्या निविदेसाठी सरनाईक यांनी याआधी ऑगस्ट २०२५ मधील तारीख जाहीर केली होती. त्यानंतर डिसेंबर २०२५ चा मुहूर्त निविदेसाठी दिला. मात्र हे दोन्ही मुहूर्त चुकले असून अजूनही निविदेची प्रतीक्षा आहे. आता आठवड्याभरात निविदा प्रसिद्ध केली जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.
२०२९ पर्यंत मेट्रो १० कार्यान्वित होणार
शिवाजी चौक – गायमुख मेट्रो १० मार्गिका ९.२ किमीची असून यासाठी अंदाजे ८ हजार ५५३ कोटी खर्च अपेक्षित आहे. ही मार्गिका मेट्रो ४, मेट्रो ४ अ आणि मेट्रो ९ मार्गिकेचा विस्तार आहे. गायमुख, रेती बंदर, चेना गाव, वर्सोवा गाव, काशिमीरा आणि मिरागाव या स्थानकांचा यात समावेश आहे. ही मार्गिका पूर्णपणे उन्नत मार्गिका आहे.
ही मार्गिका कार्यान्वित झाल्यास या मार्गिकेवरून दिवसाला चार लाख ६५ हजार प्रवासी करतील, असा दावा एमएमआरडीएकडून केला जात आहे. या मेट्रो मार्गिकेच्या कामाला सहा महिन्यांत सुरुवात होईल आणि २०२९ पर्यंत काम पूर्ण होऊन ही मार्गिका सेवेत दाखल होईल, असेही सरनाईक यांनी जाहीर केले.
