कथावाचक धीरेंद्र शास्त्री यांचा मुंबईजवळच्या मीरा रोड येथे १८ आणि १९ मार्च रोजी झालेल्या दिव्य दर्शन कार्यक्रमाला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने विरोध केला होता. त्यासंबंधी अंनिसने पोलिसांना निवेदन दिले होते. धिरेंद्र शास्त्री हे अंधश्रद्धा पसरवतात, चमत्काराचा दावा करतात आणि संत समाजसुधारकांचा अवमान करणारे भाष्य करतात, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी तसेच त्यांचा मीरा रोड येथील कार्यक्रम रद्द करावा. महाराष्ट्रात लागू असलेल्या जादूटोणाविरोधी कायद्याअंतर्गत त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र अंनिसने केली होती.
कार्यक्रम रद्द करण्याची आणि धीरेंद्र शस्त्रींवर कारवाई करण्याची मागणी अंनिसने केली होती. परंतु मीरा रोड पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी धीरेंद्र शास्त्रींवर कारवाई करण्याऐवजी महाराष्ट्र अंनिसने कार्यक्रमात धरणे, निदर्शने, आंदोलन करू नये म्हणून कलम १४९ अंतर्गत अंनिसचे राज्य प्रधान सचिव नंदकिशोर तळाशीलकर आणि अन्य कार्यकर्त्यांना नोटीस दिली होती.
हे ही वाचा >> “इतक्या तातडीने कारवाई करण्याची गरज काय?” माहीम मजार प्रकरणावरून अबू आझमींचा सरकारला सवाल
अंनिसला पाठवलेली नोटीस पोलिसांनी मागे घेतली
अंनिसने म्हटले आहे की, “आम्ही पोलिसांना दिलेल्या निवेदनात कुठेही धरणे आंदोलन करणार असे लिहिले नव्हते. तरीही पोलिसांनी कार्यकर्त्यांना चुकीची नोटीस दिली होती. त्यामुळे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या नोटिशीवर आक्षेप घेत कायदेशीर पाठपुरावा केला. ती नोटीस चुकीची असून मागे घेतली जावी, अशी मागणी केली. यासाठी आम्ही पोलीस आयुक्तालयाकडे पाठपुरावा केला. त्यानंतर पोलीस उपयुक्तांमार्फत चौकशी होऊन ती नोटीस मागे घेतली आहे.”