चार वर्षांपूर्वी रेल्वे पोलिसांमार्फत मानखुर्द बालसुधारगृहात आलेल्या एका १४ वर्षीय मुलाला पुन्हा एकदा कुटुंबाचा आधार मिळाला आहे. मुलाचे नाव आणि पत्ताही माहीत नसताना सुधारगृहातील कर्मचाऱ्यांनी या मुलाच्या कुटुंबीयांचा शोध घेतला आहे.
राजाराम ऊर्फ आसिफ बशीर शेख (वय १४)असे या मुलाचे नाव असून २०१३ या वर्षी तो बोरिवली रेल्वे पोलिसांना रेल्वे स्थानकात आढळून आला. अनेक दिवस त्याच्या कुटुंबीयांचा शोध घेण्यात आला. न्यायालयाच्या आदेशानंतर त्याला मानखुर्द बालसुधारगृहात पाठविण्यात आले.
दीड वर्षांनंतर व्यावसायिक प्रशिक्षणासाठी त्याची रवानगी माटुंगा येथील डेव्हिड ससून औद्योगिक शाळेत करण्यात आली. इथेही अनेकदा कर्मचाऱ्यांनी त्याचे नाव आणि पत्ता त्याला विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला काहीही आठवत नसल्याने त्याच्या कुटुंबीयांचा शोध घेणे कठीण होते. मात्र कर्मचाऱ्यांनी प्रयत्न सुरू ठेवले.काही दिवसांपूर्वी एका कर्मचाऱ्याने त्याला पुन्हा एकदा पत्ता विचारल्यानंतर त्याने केवळ नालासोपारा असे सांगितले. त्यावरून येथील बालकल्याण अधिकारी कैलास गायकवाड आणि इतर कर्मचारी राजारामला घेऊन नालासोपारा येथे दाखल झाले. रेल्वे स्थानकापासून काही अंतर चालत गेल्यानंतर गोराई पाडा (वसई) येथील परिसर राजारामला ओळखीचा वाटला. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी तात्काळ येथील काही दुकानदारांकडे विचारपूस केली. याच दरम्यान येथील जमीतुल अबरार या मदरशामधील मौलवींनी राजाराम ऊर्फ आसिफ याला ओळखले. त्यांच्या मदतीने या मुलाच्या आईचा पत्ता शोधून काढण्यास कर्मचाऱ्यांना यश आले. तब्बल चार वर्षांनंतर मुलगा परत मिळाल्याने कुटुंबीयांना मोठा आनंद झाला. बालकल्याण समिती येथील सर्व कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर या मुलाला त्याच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आले.