मुंबई : ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पावरील दरड कोसळण्याच्या दुर्घटनेबाबत तज्ज्ञांकडून् तथ्यशोधन केले जात आहे. याविषयीचा तथ्यशोधन चौकशी अहवाल आल्यानंतर संपूर्ण वस्तुस्थिती सभागृहासमोर मांडण्यात येईल, असे मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत स्पष्ट केले.
मिसिंग लिंकवर दरड कोसळल्यानंतर झालेल्या वाहतूक खोळंब्याबाबत सदस्य भाई जगताप आणि अनिल परब यांनी सविस्तर चर्चेची मागणी केली. यावर उत्तर देताना मंत्री शंभूराज देसाई यांनी दुर्घटना घडल्यानंतर वाहतूक पूर्ववत करणे ही सरकारची प्राथमिकता आहे. त्यासाठी सर्व यंत्रणा २४ तास कार्यरत ठेवण्यात आली. काल एका बाजूची वाहतूक सुरू करण्यात आली होती, तर मंगळवारी सकाळपासून मुंबईकडे जाणारी कनेक्टिंग लिंक पूर्णपणे वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे. घटनेचे कारण नेमके नैसर्गिक आपत्तीमुळे आहे की कामाच्या दर्जात काही त्रुटी आहेत, याची सखोल चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. विरोधी सदस्यांनी कामाच्या गुणवत्तेबाबत उपस्थित केलेल्या शंकांचाही या चौकशीत विचार केला जाईल, असे त्यांनी नमूद केले.
मुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिलेल्या माहितीकडे लक्ष वेधत देसाई म्हणाले की, गेल्या चार-पाच दिवसांत या भागात अत्यंत विक्रमी स्वरूपाचा पाऊस झाला. अनेक दशकांत झाला नव्हता इतका पाऊस अल्पावधीत पडल्याने परिस्थिती गंभीर झाली. अशा असामान्य पावसाचाही या घटनेशी संबंध आहे का, याची पडताळणी तज्ज्ञ करत आहेत. सरकार कोणालाही पाठीशी घालणार नाही, असे स्पष्ट करत देसाई म्हणाले की, जर चौकशीत कोणतीही त्रुटी आढळली तर त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल.
झाडे कोसळण्याच्या घटनांचाही उल्लेख करत त्यांनी सांगितले की, वर्षभरात जितकी झाडे पडतात, त्यापैकी सुमारे ३०० ते ३५० झाडे केवळ गेल्या दोन महिन्यांत पडली आहेत. त्यामुळे अतिवृष्टी आणि नैसर्गिक परिस्थितीचाही परिणाम लक्षात घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, या प्रकरणातील नेमकी कारणे चौकशीनंतर स्पष्ट केली जातील, अशी ग्वाही त्यांनी सभागृहाला दिली.
