मुंबई : मुंबईतील मोठ्या व लहान नाल्यांतील गाळ काढण्याच्या कामांना सुरुवात झाली आहे. या कामाचे सुयोग्य नियोजन करावे. नाल्यांमधून उपसलेल्या गाळाची ४८ तासांत निर्दिष्ट स्थळावर विल्हेवाट लावावी, अशी सूचना महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी यंत्रणेला केली. दरम्यान, मिठी नदीतून गाळ काढण्याची कामे रविवारपासून सुरू होतील. विहित मुदतीत ही कामे पूर्ण व्हावीत, त्यादृष्टीने नियोजन करून कार्यवाहीला वेग द्यावा. गाळ काढण्याच्या कामांवर देखरेख ठेवण्यासाठी महानगरपालिकेच्या उप आयुक्त, सहायक आयुक्त यांनी प्रत्यक्ष कार्यस्थळी भेट द्यावी, असेही त्यांनी नमूद केले.
पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून मुंबईतील मोठ्या व लहान नाल्यांमधून गाळ काढण्याची कामे वेगाने सुरू आहेत. महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी या कामांचा शनिवारी प्रशासकीय विभाग आणि परिमंडळनिहाय आढावा घेतला. त्यावेळी गगराणी यांनी आवश्यक सूचना केल्या. ट्रॅश ब्रूममुळे नदी, नाले आणि समुद्रात तरंगणारा कचरा अडवला जातो. प्रामुख्याने नाल्यांच्या तोंडावर लावल्या जाणाऱ्या ट्रॅश बूममुळे कचरा समुद्रात जाण्यापासून रोखला जातो आणि तो सहजपणे गोळा करून विल्हेवाट लावता येते. महानगरपालिकेकडे एकूण १४ ट्रॅश बूम आहेत. आवश्यक त्या ठिकाणी ‘ट्रॅश बूम’चा वापर करावा, असे गगराणी यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.
मोगरा नाला, मजास नाला , मानखुर्द नाला, सोमय्या नाला, वाकोला नाला व दादर – धारावी नाल्याच्या ठिकाणी अधिक प्रभावीपणे कामकाज करावे. या ठिकाणी ‘ट्रॅश बूम’ आणि अन्य यंत्रसामग्री तैनात करावी. पर्जन्य जल वाहिन्यांची सुरू असलेली सर्व कामे ३१ मेपर्यंत पूर्ण करावी. रेल्वे प्रशासन, मेट्रो प्रशासन यांच्या समवेत संयुक्त दौरा करावा, अशीही सूचना त्यांनी केली.
पावसाळापूर्व उपाययोजनांसाठी करण्यात येत असलेल्या कामांमध्ये नाल्यांमधील गाळ काढण्यासह नाल्यांचे रुंदीकरण, रेल्वे रुळाखालील व इतर ठिकाणी बंदिस्त प्रवाह मार्गांची (कल्व्हर्ट) स्वच्छता करणे, ही कामे देखील समाविष्ट आहेत. रेल्वे प्रशासनासमवेत समन्वय साधून रेल्वे हद्दीतील व त्यालगतच्या वेगवेगळ्या नाल्यांमधून गाळ काढण्यासह कल्व्हर्ट स्वच्छता कामांची पाहणी करावी. पाण्याचा जलद गतीने निचरा व्हावा, यासाठी विविध ठिकाणी पावसाळी पाण्याचा उपसा करण्यासाठी पंप बसवावेत, असेही त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.
नालेसफाईवर एआयद्वारे देखरेख
पावसाळा सुरू व्हायला अद्याप दोन महिन्यांचा कालावधी आहे. ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार गाळ उपसण्याचे कामकाज सुरू आहे. उर्वरित कालावधीत गाळ काढण्याची कामे वेगाने पूर्ण करावीत, अशी सूचना अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी केली. नाल्यातून गाळ काढण्याच्या कामासाठी यावर्षी काही कंत्राटदारांची नव्याने नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्यासोबत समन्वय साधून प्राधान्याने कामे पूर्ण होतील हे सुनिश्चित करावे. गाळ उपसा संदर्भात प्राप्त होणाऱ्या सर्व चित्रफितींचे महानगरपालिका प्रशासनाकडून कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीच्या मदतीने विश्लेषण केले जाणार आहे. त्याद्वारे नाल्यातून गाळ उपसा करण्याच्या कामांची योग्य देखरेख करणे, कामांमध्ये संपूर्ण पारदर्शकता राखणे यासाठी प्रशासनाला मदत होणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. तसेच, नाल्यातून गाळ काढण्याच्या प्रक्रियेत कोणताही गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही. प्रसंगी कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
