मुंबई : सुमारे ६५ कोटी रुपयांच्या मिठी नदी गाळ उपसा घोटाळाप्रकरणी अटकेत असलेला कंत्राटदार शेरसिंह राठोड याला सत्र न्यायालयाने नुकताच जामीन मंजूर केला. सह-आरोपी आणि महानगरपालिका अधिकाऱ्यांनी रचलेल्या कटात तो सहभागी नसल्याचे सकृतदर्शनी स्पष्ट होत असल्याचे निरीक्षण न्यायालयाने त्याला जामीन मंजूर करताना नोंदवले.
बनावट एमओयू तयार करून बनावट देयकांद्वारे २९.६२ कोटी रुपये मिळवल्याच्या आरोपांतर्गत मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (ईओडब्ल्यू) राठोड याला गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये अटक केली होती. पोलिसांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, राठोड याने सह-आरोपी-किरगो स्पेशालिटीज फर्मचे मुख्य कार्यकारी अधिकारी केतन कदम आणि मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसह मिठी नदीतून गाळ काढण्याच्या कामात स्टिल्ट पुशिंग पॉन्टून मशीन (एसपीपीएम) आणि मल्टीपर्पज अँफिबियस पॉन्टून मशीन (एमएपीएम)/ट्रक्सर) वापरण्याबाबत कट रचला होता. त्यांच्या कृत्यामुळे महापालिकेचे ६५ कोटी रुपयांचे नुकसान झाले, असा पोलिसांचा आरोप होता.
व्हर्गो स्पेशालिटीजकडे प्रत्यक्षात नसलेल्या पॉन्टून मशीनसाठी भाड्याने करार करणे आणि मृत जमीन मालकाची स्वाक्षरी असलेला बनावट जमीन वापर करार सादर केल्याचा आरोप देखील राठोड याच्यावर आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन जी शुक्ला यांनी राठोड याने केलेला जामीन अर्ज मंजूर केला. राठोड याच्या कंपनीने (मेनदीप एंटरप्रायझेस) काम पूर्ण केले आणि महापालिका अधिकाऱ्यांनी कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर सर्व देयके त्याच्या फर्मला देण्यात आल्याचे आढळले आहे, असे न्यायालयाने राठोड याला दिलासा देताना नमूद केले.
राठोड याने सादर केलेली कागदपत्रे बनावट आहेत का ? हा खटल्याच्या वेळी विचारात घेण्यात येणारा विषय आहे. तथापि, राठोड याचा कटात सहभाग नव्हता आणि जमीन मालकांकडून सामंजस्य करार करण्यात त्याचा कोणताही अप्रामाणिक हेतू नव्हता हे सकृतदर्शनी दिसून येते. त्यामुळे, त्याला जामीन नाकारता येऊ शकत नाही, असे नमूद करून न्यायालयाने राठोड याला जामीन मंजूर केला.
