मुंबई : कुणा एकेकाळी झुळूझुळू वाहणाऱ्या मुंबईमधील मिठी नदीमधून व्यापाऱ्यांची जहाजे येत-जात होती. मात्र कालौघात मिठी काठी झोपडपट्ट्या, छोटे-मोठे कारखाने, गोदामे, तबेले आदी उभे राहिले आणि नदीला नाल्याचे रुप आले. मुंबईत अतिवृष्टीमुळे २००५ मध्ये हाहाकार उडाला आणि झोपी गेलेले राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेला जाग आली.
त्यानंतर मिठी नदीच्या विकासासाठी संकल्प सोडण्यात आला असला, तरी प्रदुषणाच्या विळख्यात अडकलेल्या नदीला गतवैभव मिळवून देण्यात अपयश आले आहे. गेल्या सहा वर्षांमध्ये मिठी नदीमधून तब्बल १६ लाख ९२ हजार मेट्रीक टनाहून अधिक गाळ उपसण्यात आला. पण दुर्गधयुक्त पाण्याच्या खळखळाटामुळे मिठीचे गटाराचे रुप बदललेले नाही. दुषित पाणी, दुर्गंधी आदींमुळे आसपासच्या रहिवाशांचे आरोग्य धोक्यात येत आहे. प्रदुषणाच्या मगरमिठीतून मिठी कधी मुक्त होणार असा प्रश्न गेली अनेक वर्ष रहिवासी विचारत आहेत. पण त्याचे ठोस उत्तर प्रशासनाकडे नाही.
मुंबईमध्ये २६ जुलै २०२५ रोजी अस्मानी संकट कोसळले. मुसळधार पावसामुळे मुंबईतील रस्ते पाण्याखाली गेले. अनेक इमारतींमध्ये पावसाच्या पाण्याचे साम्राज्य पसरले. एकूणच मुंबईत हाहाकार उडाला आणि जनजीवन विस्कळीत झालेच, पण अनेकांना प्राण गमवावे लागले, अनेकांचे संसार उद््ध्वस्त झाले. त्यानंतर केलेल्या अभ्यासामध्ये २६ जुलै २०२५ रोजी मिठी नदीने अक्राळविक्राळ रुप धारण केल्याचे निदर्शनास आले. दुथडी भरून वाहणाऱ्या मिठी नदीतील पाण्याने लगतचे रस्ते व्यापले. एकूणच मिठीचा प्रकोप अनेक मुंबईकरांच्या जीवावर बेतला.
मुंबईतील शहर, पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगरांमधून वाहत समुद्राला मिळणाऱ्या मिठी नदीची लांबी सुमारे १७ किलोमीटर असून त्यापैकी ११ किलोमीटर लांबीच्या (फिल्टरपाडा, पवई ते सीएसटी पूल, कुर्लादरम्यान) क्षेत्रातील विकास कामांची जबाबदारी मुंबई महापालिकेवर, तर उर्वरित सहा किलोमीटर लांबीच्या (सीएसटी पूल, कुर्ला ते माहीम कॉजवे दरम्यान) मिठी नदीच्या विकासाची कामे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणावर सोपविण्यात आली. मिठी नदी विकास आणि संरक्षण प्राधाकरणाच्या मार्गदर्शनाखाली ही कामे हाती घेण्यात आली. नदीचे खोलीकरण, रुंदीकरण, काठावरील अतिक्रमण हटवणे, नदीच्या दुतर्फा संरक्षक भिंत बांधणे, गाळ उपसणे अशा स्वरुपाची कामे करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारितील मिठी नदीचे कुर्ला – कलिना पूल ते सीएसटी पुलादरम्यानचा भाग वगळता उर्वरित नदीचे रुंदीकरण आणि खोलीकरण जवळपास पूर्ण झाल्याचा दावा महापालिकेकडून करण्यात येत आहे. एकूण मिठी नदीचे रुंदीकरण आणि खोलीकरणाचे ९३.९६ टक्के काम, तर संरक्षक भिंत बांधण्याचे ९४.६० टक्के काम पूर्ण झाले असून त्यामुळे नदीची पाणी धारण क्षमता आणि वहन क्षमतेत अनुक्रमे दुपटीने व तिपटीने वाढ झाल्याचाही दावा करण्यात येत आहे.
मिठी काठी उभ्या असलेल्या झोपटपट्ट्यांतून आजही सर्रास कचरा फेकण्यात येतो. तेसच मुंबईत ठिकठिकाणी सुरू असलेला पुनर्विकास अथवा विकास कामात निर्माण होणारा राडारोडा नदीत फेकण्यात येत असल्यामुळे आजही मिठी नदीची दुर्दशाच झाली आहे. नदीमध्ये कचरा टाकू नये, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेकडून वारंवार मिठी काठी वास्तव्यास असलेल्या रहिवाशांना करण्यात येते. मात्र नदीत कचरा भिरकावण्याच्या सवयीत बदल झालेला नाही. लगतच्या झोपड्यांमधून नदीत सोडण्यात येणाले मलजल, सांडपाणी यामुळे पाणी प्रदुषित होत आहे. नदीतील दुषित पाणी, दुर्गंधी, डांसांचा उपद्रव आदींमुळे आसपास वास्तव्याला असलेल्या रहिवाशांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे.
मिठी नदीतून उपसलेला गाळ
वर्ष – गाळ (मेट्रीक टन)
२०२५-२६ – १,७१,०४९.१५
२०२४-२५ – ३,०४,७२७.०८
२०२३-२४ – ३,६१,६५०.१४
२०२२-२३ – २,९९,७७१.९५
२०२१-२२ – ४,२३,२०८.८५
२०२०-२१ – १,३१,९४४.९२
