मुंबई : धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत मिठीनदीचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय धारावी पुनर्विकास प्रकल्पाने (डीआरपी) घेतला आहे. यासाठी मिठी नदीलगत ३.३ किमीचा प्रोमेनेड अर्थात नदीकिनारा मार्ग विकसित केला जाईल. या नदीकिनारा मार्गात उद्यान, सायकल मार्गिकेसह अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. या ठिकाणी मोठ्या संख्येने वृक्षलागवड व वृक्षसंवर्धन करून हरित पट्टा विकसित केला जाईल.
मिठीनदीलगत ३.३ किमीचा नदीकिनारा मार्ग तयार केला जाणार असल्याची माहिती एएनडीपीएलने दिली. माटुंगा कल्व्हर्टपासून मिठी नदीच्या मुखापर्यंतच्या विस्तारित मार्गावर हा नदीकिनारा मार्ग विकसित केला जाईल. या नदीकिनारा मार्गावर उपाहारगृह, निरीक्षण मंच (व्ह्यूइंग डेक), फेरफटका मारण्यासाठी विशेष मार्ग, सांस्कृतिक उपक्रमांसाठी स्वतंत्र जागा अशा सुविधांचा यात समावेश असेल.

नदीकिनाऱ्यालगत स्थानिक प्रजातींची झाडे, प्रदूषण शोषून घेणाऱ्या वनस्पतीही लावण्यात येईल. नदीकिनारा मार्ग प्रकल्पातील इतर हरित क्षेत्रांशी जोडण्यासाठी पादचारी पूल व सायकल मार्गिका या पर्यायांचा समावेश असेल.
धारावीत आठ हजार झाडे तोडली जातील. त्या मोबदल्यात पालघरमधील चहाडे गावात ३० हजार झाडांची लागवड करण्यात आली असली, तरी प्रत्यक्षात या मोबदल्यात महामुंबईत दोन लाख झाडे लावण्याचे लक्ष्य असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

लागवड नियोजन
धारावीत ४० हजार झाडांचे संवर्धन व लागवड करण्यात येईल. दोन लाखांपैकी ३० हजार झाडांची लागवड झाली असून येत्या काही महिन्यांत ७५ हजार झाडे लावली जातील. उर्वरित झाडांची लागवड टप्प्याटप्प्याने केली जाईल. वृक्षलागवडीसाठी व देखभालीसाठी पर्यावरण विषयक सल्लागार संस्था टेराकॉन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही संस्था वैज्ञानिक पद्धतीने वृक्ष लागवड, सिंचन, संरक्षण व देखभाल यावर देखरेख ठेवणार आहे. प्रत्येक सहा महिन्यांनी वृक्षलागवड, देखभालीसंबंधीचा अहवाल या संस्थेकडून सादर केला जाईल. वृक्षलागवड व पाच वर्षांसाठी झाडांच्या देखभालीचा खर्च एएनडीपीएल करणार आहे.
