मुंबई : मिठी नदीच्या पाण्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी सुरू असलेल्या मिठी नदी पुनरुज्जीवन प्रकल्पांतर्गत सांडपाण्याचे प्रवाह वळवण्याच्या कामाच्या खर्चात २१ कोटींनी वाढ होणार आहे. त्यामुळे मूळ ६०४ कोटींचा प्रकल्प ६२५ कोटींवर जाणार आहे. वस्तू व सेवा कराच्या रचनेत २०२२ मध्ये केलेल्या बदलांमुळे ही खर्चवाढ झाल्याचे कारण पुढे करण्यात आले आहे.
मिठी नदीच्या पाण्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी सुरू असलेल्या मिठी नदी पुनरुज्जीवन प्रकल्पांच्या पॅकेज चार अंतर्गत मिठी नदीतील सांडपाण्याचे प्रवाह वळवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मिठी नदीत येणारा सांडपाण्याचा प्रवाह वळवण्यासाठी धारावी मलजल प्रक्रिया केंद्रापर्यंत बोगदा बांधण्यात येणार आहे. याकरीता २०२१ मध्ये कंत्राट देण्यात आले आहे. त्यावेळी ६०४ कोटीचे कंत्राट देण्यात आले होते. या कामाचा कालावधी चार वर्षांचा असून या कामाला फेब्रुवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. सद्यस्थितीत काम ९६.६७ टक्के पूर्ण झाले असून उर्वरित कामास मुदतवाढ दिली जाणार आहे. मात्र कंत्राटदाराने आता या कामाच्या खर्चात वाढ झाल्याचे म्हटले आहे. या कामाच्या खर्चात २१ कोटींनी वाढ करण्याची विनंती कंत्राटदाराने केली असून त्याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर ठेवण्यात आला आहे.
वाढ कशामुळे
केंद्र सरकारने २०२२ मध्ये वस्तू व सेवा कराच्या रचनेत बदल केले होते. निविदा प्रक्रिया सुरू होती तेव्हा वस्तू व सेवा कर १२ टक्के होता. तो १८ टक्क्यांवर नेण्यात आला आहे. करवाढ झाल्यामुळे कंत्राट रकमेत वाढ झाल्याचे कंत्राटदाराच्या आता लक्षात आले असून त्यांनी आता वाढीव खर्च मागितला आहे.
अशी वाढ दिल्यास पालिकेचा तोटा
वस्तू व सेवा करातील या वाढीचे कारण देत सगळेच कंत्राटदार पुढे आल्यास येत्या काळात महापालिकेला दोन हजार कोटींचा तोटा होईल, असे मत काँग्रेसचे गटनेते अशरफ आजमी यांनी स्थायी समितीच्या बैठकीत व्यक्त केले. स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी या प्रस्तावावरील निर्णय राखून ठेवला आहे.
मिठी नदीत १६८ दशलक्ष लिटर मलजल
मिठी नदीचे पाणलोट क्षेत्र ७२९५ हेक्टर असून पावसाळ्यात पवई व विहार तलावाचे अतिरिक्त पाणी मिठी नदीतून प्रवाहित होते. तसेच आजूबाजूच्या परिसरातील बिगर पावसाळी प्रवाह देखील मिठी नदीतून वाहतो. मिठी नदीतून प्रवाहित होणारा बिगर पावसाळी प्रवाह रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने प्रकल्प हाती घेतला आहे. मिठी नदीमध्ये बापट नाला व सफेद पूल नाला या दोन नाल्यांद्वारे मिठी नदीत येणारा बिगर पावसाळी जलप्रवाह जास्त आहे. भविष्यात हा जलप्रवाह वाढण्याची शक्यता आहे. बापट नाला येथून ७८ दशलक्ष लिटर व सफेद पूल नाला येथून ९० दशलक्ष लिटर बिगर पावसाळी प्रवाह भविष्यात मिठी नदीत येईल, असा अंदाज आहे. त्यामुळे २०५१ पर्यंत मिठी नदीत १६८ दशलक्ष लिटर बिगर पावसाळी प्रवाह विचारात घेऊन बापट नाला व सफेद पूल नाला येथून धारावी येथील प्रस्तावित मल जल प्रक्रिया केंद्रापर्यंत मलजल बोगदा बांधण्यात येणार आहे.
