मुंबई: वादग्रस्त विधाने आणि कथित गैरवर्तनामुळे सातत्याने चर्चेत राहणारे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्याबाबत पक्षाचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. गायकवाड यांच्या वक्तव्यांमुळे पक्षाच्या प्रतिमेला धक्का बसत असल्याने शिंदे यांनी त्यांची चांगलीच कानउघाडणी केली. दिवाळीनंतर त्यांच्याविरोधात शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता एका नेत्याने व्यक्त केली आहे.
बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी अलीकडेच आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या अंत्यसंस्काराला कोणीही जाऊ नये, अशा आशयाचे वादग्रस्त विधान केले होते. शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल असा इशारा शिंदे यांनी दिला आहे. अशावेळी त्यांच्या पक्षाचा आमदार शेतकऱ्यांबद्दल वादग्रस्त विधाने करीत असताना त्याच्यावर काहीही कारवाई केली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शेतकरी आत्महत्यांसारख्या संवेदनशील विषयावर लोकप्रतिनिधींनी जबाबदारीने बोलणे अपेक्षित असताना, अशा विधानांमुळे पक्षाला राजकीय टीकेला सामोरे जावे लागत असल्याची भावना शिवसेनेतील काही नेत्यांकडून व्यक्त केली गेली आहे.
गायकवाड यांच्याशी संबंधित वादांची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षी विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान मुंबईतील आमदार निवास परिसरातील उपाहारगृहात एका वेटरला बेदम मारहाण केली होती. या घटनेमुळेही राजकीय वर्तुळात बरीच चर्चा रंगली होती. सत्तधारी पक्षातील आमदारांची अरेरावी कशी वाढली आहे ते सांगितले जात होते. वारंवार होणारी वादग्रस्त विधाने आणि अशा प्रकारच्या आरोपांमुळे पक्षाच्या सार्वजनिक प्रतिमेवर परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.
एकनाथ शिंदे यांनी पक्षातील नेत्यांना आणि लोकप्रतिनिधींना सार्वजनिक वक्तव्यांबाबत संयम राखण्याचा संदेश देण्याची भूमिका घेतली आहे. त्यांचे राजकीय गुरु आनंद दिघे यांच्या ‘कार्यपद्धतीचा’ दाखला देत गायकवाड यांना समज देण्यात आली आहे.
पक्षाची प्रतिमा जपण्यासाठी वादग्रस्त वक्तव्ये खपवून घेतली जाणार नाहीत, असा स्पष्ट संदेश देण्याच्या दृष्टीने गायकवाड यांच्यावर निलंबनासारखी कारवाई करण्याचा पर्याय विचाराधीन असल्याची चर्चा पक्षांतर्गत वर्तुळात आहे. दिवाळीनंतर यासंदर्भात निर्णय घेतला जाणार आहे.
