मुंबई : मुंबईतील वानखेडे मैदानावर होत असलेल्या टी-२० विश्वचषकाचे तिकीट न मिळाल्याने विधान परिषदेत आमदार संतप्त झाले. पोलीस आणि अधिकाऱ्यांना तिकीट मिळते, मग आमदारांना का नाही. पैसे घ्या पण तिकिट मिळायलाच हवे, अशी आग्रही मागणी करीत आमदारांनी विधान परिषदेत मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कारभारावर टीका केली. भारत-इंग्लंड टी-२० सामान्याची उपांत्य फेरीसाठीच्या लढतीची तिकीट न मिळाल्याची तक्रार विधान परिषदेत सभापतींकडे करण्यात आली.

सचिन अहिर यांनी हा मुद्दा उपस्थित करताना भारत-इंग्लंड सामना मुंबईत होत आहे, याचा अभिमान आहे. मात्र पूर्वी शरद पवार बीसीसीआयचे अध्यक्ष असताना अधिवेशनाच्या काळात सदस्यांना पास दिले जात. आता मोठ्या कंपन्यांचे लोक स्टेडियममध्ये बसतात, पण आमदारांना पास मिळत नाहीत. सनदी अधिकारी आणि पोलिसांना तिकीट मिळतात, पण आमदारांना पास मिळत नसल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली. याला उद्योगमंत्री उदय सामंत यांनीही दुजोरा दिला.

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर सामना असताना आम्ही सदस्यांना तिकीट देतो तसेच येथेही आमदारांसाठी पासची व्यवस्था व्हायला हवी. अधिवेशन सुरू असताना सदस्यांना सामना पाहण्यासाठी योग्य व्यवस्था असावी, असे ते म्हणाले. यावर सभापती राम शिंदे यांनी निर्देश देताना सचिन अहिर यांनी अतिशय केविलवाणी परिस्थिती मांडली आहे. क्रीडामंत्री बघ्याची भूमिका घेत आहेत. आमदारांसाठी पासेसची व्यवस्था करायला हवी, अशा सूचना केल्या.

पैसे घ्या, पण तिकीट द्या!

अनिल परब यांनी आम्हाला फुकट पास नकोत. आमच्याकडून पैसे घ्या, पण तिकीट तरी द्या. आम्हाला फुकट काहीही नको, अशी मागणी केली. यावर मंत्री दत्तात्रय भरणे यांनी क्रीडा विभागालाही पास दिले जात नाहीत. भविष्यात अधिवेशनाच्या काळात सामने असतील तर सदस्यांसाठी पास उपलब्ध करून देण्याची तरतूद केली जायला हवी, अशी अपेक्षा केली. मात्र तिकिटाच्या मुद्द्यावर विधिमंडळातील आमदरांपासून मंत्र्यांपर्यंतची सर्वच व्यवस्था हतबल झाल्याचे या मुद्द्यावरील चर्चेत दिसून आले.