मुंबई: संतोष बांगर आणि प्रकाश सुर्वे या आमदारांनी केलेली मारहाण आणि दिलेल्या धमक्यांचे सरकार मुळीच समर्थन करीत नाही. या आमदारांच्या वर्तनाची चौकशी करून त्यात दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सरकार कोणत्याही बाबतीत सूडबुद्धीने काम करणार नाही, अशी ग्वाही देतानाच, विरोधकांना गझनीची लागण झाली असून त्यांची आमच्या सरकारची नव्हे तर आपला एकजुटीची चिंता करावी, असा सल्लाही यावेळी शिंदे आणि फडणवीस यांनी विरोधकांना दिला. राज्य विधिमंडळाच्या उद्यापासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित चहापानानंतर मुख्मयंत्री माध्यमांशी बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील आदी उपस्थित होते. शिवसेनेतील शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी मध्यान्ह भोजनाच्या गुणवत्तेवरून एकास मारहाण केल्याचे तसेच  प्रकाश सुर्वे यांनी विरोधकांना ठोकून काढण्याचे आदेश आपल्या कार्यकर्त्यांना दिल्यांचे तीव्र पडसाद राज्यात उमटत आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात आपल्या पक्षात यावे यासाठी राष्ट्रवादीकडून शिवसैनिकावर खोटे गुन्हे दाखल करण्यात येत होते. शिवसैनिकांचा छळ केला जात होता. मात्र आम्ही कुणाशीही सूडबुद्धीने वागणार नाही असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.

लवकरच शेतकऱ्यांना मदत

 राज्यात यंदा चांगला पाऊस होत असून एकाही तालुक्यात टंचाईची परिस्थिती नाही. अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना मोठय़ा प्रमाणात मदत जाहीर करण्यात आली असून पुरवणी मागण्या मंजूर होताच ही मदत वाटप केली जाईल. शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे असल्याचेही शिंदे यांनी यावेळी सांगितले. तसेच महाविकास आघाडी सरकारच्या काळातील सर्वच निर्णयांना स्थगिती दिलेली नसून केवळ या निर्णयांचे पुनरालोकन केले जात आहे. सरकार अल्पमतात असताना आणि त्यातही मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यावर तत्कालीन सरकारने ३०० पेक्षा अधिक निर्णय घेतले. त्यातील अनेक निर्णय हे निधीच्या तरतुदीपेक्षा अधिक खर्चाचे होते. त्यामुळे या निर्णयांचे पुनरावलोकन केले जात असून योग्य निर्णयांची अंमलबजावणी केली जाईल असेही शिंदे स्पष्ट केले.

विरोधकांनी एकजुटीची चिंता करावी- फडणवीस

 चहापानावर बहिष्कार टाकताना विरोधकांनी दिलेल्या पत्रातून ते दीड महीन्यापूर्वी सत्तेत होते याचे त्यांना विस्मरण झाल्याचे दिसून येते. मात्र त्यांचा सरकारवर विश्वास असल्याचे दिसून येत असून त्यांनी पत्राच्या माध्यमातून केलेल्या सर्व अपेक्षा पूर्ण करू अशा टोला फडणवीस यांनी यावेळी लगावला. विरोधकांना गझनीची लागण झाली असून त्यांनी सरकारची नव्हे आपल्या एकजुटीची चिंता करावी, महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाही शिवसेनेच्या वाटय़ाला अर्थसंकल्पाच्या १२.८८ टक्के निधी मिळाला होता. मात्र या सरकारमध्ये आमचे ११५ आमदार असूनही ६० टक्के निधी मिळाला असून शिवसेनेला(शिंदे गट) ५० आमदार असतानाही ४० टक्के निधी मिळाल्याचा दावाही त्यांनी केला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mlas investigate chief minister eknath shinde announcement ysh
First published on: 17-08-2022 at 00:02 IST