मुंबई : ‘शिवसैनिकांना ठोकून काढा, हात तोडा, तंगडी तोड़ा, कोथळा काढा’, अशी महाराष्ट्रात संघर्ष पेटविण्याची भाषा करणाऱ्या आणि सरकारी कर्मचाऱ्यांना मारझोड करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांना सत्तेची मस्ती आली का, अशा शब्दांत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हल्ला चढविला. सरकारमधील आमदारांचे हे वर्तन उभा महाराष्ट्र उघडय़ा डोळय़ांनी बघतो आहे, हे लक्षात घ्या असा इशारा देत त्यांनी आज बुधवारपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी-विरोधकांमध्ये राजकीय संघर्ष अटळ असल्याचे संकेत दिले.

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या बैठकीनंतर विधान भवनात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवार यांनी, सरकारमधीलच काही आमदार राज्यात संघर्ष पेटविण्याची भाषा करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करीत आहेत असा आरोप केला.

अजित पवार म्हणाले की, मुंबईतील  शिंदे  गटातील एक आमदार शिवसैनिकांना ठोकून काढा, हात तोडा, हात तोडता आले नाही तर तंगडी तोडा, आरे ला कारे म्हणा, कोण अंगावर आले तर कोथळा काढा, अशी भाषा करीत आहे. हा शाहू, फुले,आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. आपले पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी सुसंस्कृतपणा शिकवला, त्या महाराष्ट्रात तोडा, फोडा, मारा ही भाषा केली जाते, एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि भाजपला हे पटते का? असा सवाल त्यांनी केला.

शिंदे गटातील आणखी एका आमदार संतोष बांगर यांनी सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण केली आहे. तुम्ही कायदा हातात घ्यायला लागला आहात. तुम्ही स्वत: ला कोण समजता, सत्ता आली म्हणजे मस्ती आली का तुम्हाला ?  कुणीही व्यक्ती असली तरी त्याला संविधान, कायदा, नियम सारखे असतात. कायद्यापेक्षा कुणीही मोठा नाही. अजून सरकार नीट अस्तित्वात आले नाही, तोपर्यंत सरकारमधील आमदारांना इतकी मस्ती आलीय का, असा पवार यांनी हल्ला चढविला. ज्या आमदाराने सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण केली,  त्याच्यावर गुन्हा दाखल झाला तरी, मी असाच वागणार इथपर्यंतची त्यांना मस्ती आली  आहे. सत्ता लगेच डोक्यात गेली का? अशा पध्दतीने वागणाऱ्या आमदारांवर तातडीने कारवाई झाली पाहिजे आणि ती लोकांना दिसली पाहिजे.

प्रकाश सुर्वे यांच्या विधानावर वादंग

मागाठणे मतदारसंघाचे आमदार प्रकाश सुर्वे हे चिथावणीखोर विधानामुळे वादात सापडले आहेत. ‘कोणी आरे म्हटले तर कारे म्हणा. हात नाही तोडला तर तंगडी तोडा, ठोकून काढा. दुसऱ्या दिवशी जामिनावर सोडावायला मी बसलो आहे, असे विधान शिंदे गटातील आमदार प्रकाश सुर्वे यांनी दहिसरमधील एका समारंभात बोलताना केले. हे भाषण समाजमाध्यमातून प्रसारित झाल्याने सुर्वे यांच्यावर टीकेचा भडिमार सुरू झाला.