मुंबई: सांताक्रुझ येथील व्ही. एन. देसाई रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागामध्ये बोगस डॉक्टर भरत सावंतने सेवा दिलेल्या प्रकरणानंतर आता महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे (एमएमसी) नोंदणी असलेले बनावट कागदपत्रे सादर करून कंत्राटदारांकडून मुंबई महानगरपालिकेची दिशाभूल केल्याची प्रकरणे उघडकीस येत आहेत. रशियामध्ये महाविद्यालयीन वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलेल्या परंतु एमएमसीकडे नोंदणी नसतानाही बनावट कागदपत्रे सादर करून एका महिला डॉक्टरने व्ही. एन. देसाई रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागामध्ये सेवा दिल्याचे उघडकीस आले. दीड वर्षांमध्ये हे चौथे प्रकरण असल्याने कंत्राटदाराच्या माध्यमातून अतिदक्षता विभागामध्ये पुरविण्यात येणाऱ्या सेवेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
महाराष्ट्रामध्ये वैद्यकीय सेवा देण्यासाठी प्रत्येक डॉक्टरला एमएमसीकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. मुंबई महानगरपालिकेच्या उपनगरीय रुग्णालयामध्ये कंत्राटदाराच्या माध्यमातून आरोग्य सेवा पुरविण्यात येत होती. मात्र कंत्राटदाराच्या माध्यमातून पुरविण्यात येणाऱ्या डॉक्टरांपैकी अनेकांनी एमएमसीकडे नोंदणी नसतानाही बनावट कागदपत्रे सादर केल्याचे उघडकीस येत आहे. माहिती अधिकारामध्ये मिळालेल्या माहितीनुसार काजोल शिंदे हिने सादर केलेल्या एमएमसीच्या प्रमाणपत्रामध्ये नोंदणी क्रमांक ५८५१/२०२१ दिला आहे. मात्र या क्रमांकाचे प्रमाणपत्र काजोल हिच्या नावाने जारी केले नसल्याचे एमएमसीकडून स्पष्ट करण्यात आले. त्याचप्रमाणे डॉक्टरांच्या शैक्षणिक व व्यावसायिक कागदपत्रांची पडताळणी न करता त्यांना आयसीयूमध्ये काम करण्याची परवानगी दिल्याप्रकरणी एमएमसीने व्ही. एन. देसाई रुग्णालय प्रशासनाकडून स्पष्टीकरण मागविले आहे. या प्रकरणी व्ही. एन. देसाई रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. मयुरा नागळे यांच्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
उघडकीस आलेली प्रकरणे
– भरत सावंत हा परदेशातून वैद्यकीय शिक्षण अर्धवट सोडून भारतात परतल्यानंतर त्याच्याकडे कोणतेही कागदपत्रे नसताना त्याने महानगरपालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये तब्बल अडीच वर्षे काम केले. बोरिवली भगवती रुग्णालयामध्ये २०२१ मध्ये कंत्राटदारामार्फत काम केले. त्यानंतर अन्य कंत्राटदारामार्फत त्याने मार्च २०२५ पर्यंत व्ही. एन. देसाई रुग्णालयात सेवा दिली. त्यानंतर जोगेश्वरी ट्रॉमा रुग्णालयात तीन महिने सेवा दिली.
– एमएमसीमध्ये नोंदणी नसतानाही एमएमसीची बनावट कागदपत्रे सादर करून वाय. एस. एन. चंद्रशेखर यांनीही महानगरपालिकेच्या व्ही. एन. देसाई रुग्णालय, वांद्रे भाभा रुग्णालय, जोगेश्वरी ट्रॉमा रुग्णालयात सेवा दिली. तसेच डॉ. राहुल यादव यानेही बनावट प्रमाणपत्रे सादर करून व्ही. एन. देसाई रुग्णालयामध्ये सेवा दिली.
– रशियामध्ये वैद्यकीय शिक्षण घेऊन भारतात परतलेल्या काजोल शिंदे हिच्याकडे एमएमसीचे नोंदणी नसतानाही तिने बनावट कागदपत्रांच्या आधारे व्ही. एन. देसाई रुग्णालयामध्ये कंत्राटदाराच्या माध्यमातून सेवा पुरविल्याचे उघडकीस आले आहे.
