मुंबई : महाराष्ट्र आणि गुजरातला जोडणारी वंदे भारत एक्स्प्रेस आता अधिक क्षमतेसह धावणार असून या गाडीमध्ये डब्यांची संख्या वाढवण्यात येत आहे. मुंबई ते अहमदाबाद वंदे भारत एक्स्प्रेसला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद आहे. त्यामुळे या एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांची गर्दी कायम असते.

गर्दीमय प्रवास होऊ नये, यासाठी या वंदे भारत एक्स्प्रेसच्या डब्यांच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. वंदे भारत एक्सप्रेसच्या वाढलेल्या क्षमतेमुळे मुंबई – गुजरात प्रवास अधिक सोयीस्कर, वेगवान आणि आरामदायी होईल. सध्या १६ डब्यांची धावणारी वंदे भारत आता २० डब्यांसह धावण्यास सुरुवात होणार आहे. या निर्णयामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल.

मुंबई-अहमदाबाद या महत्त्वाच्या मार्गावर भारतीय रेल्वेकडून धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. विशेषतः व्यावसायिक, नोकरदार तसेच पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात या रेल्वेगाडीचा वापर करत असल्याने अतिरिक्त आसनांची गरज भासत होती. त्यामुळे २० डब्यांच्या स्वरूपात येणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसमुळे अधिक प्रवाशांना प्रवासाची संधी मिळेल. प्रतीक्षा यादीत घट होईल. आरामदायी आणि जलद प्रवास होईल.

मुंबई सेंट्रल – अहमदाबाद – मुंबई सेंट्रल वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांची संख्या १३० टक्क्यांपर्यंत असते. ही संख्या वाढत असल्याने, प्रवाशांना आरामदायी प्रवास होत नाही. प्रवाशांचा प्रवास सोयीचा करण्यासाठी गाडी क्रमांक २२९६१/२२९६२ मुंबई सेंट्रल – अहमदाबाद – मुंबई सेंट्रल वंदे भारत एक्स्प्रेसमधील डब्यांची संख्या तात्पुरती १६ वरून २० पर्यंत वाढवण्यात येईल.

तसेच गाडी क्रमांक १२९३३/१२९३४ मुंबई सेंट्रल – वटवा / अहमदाबाद – मुंबई सेंट्रल कर्णावती एक्स्प्रेसचे टर्मिनस मुंबई सेंट्रलवरून बदलून वांद्रे टर्मिनस करण्यात येईल.

गाडी क्रमांक २२९६१/२२९६२ ला तात्पुरते चार अतिरिक्त डबे जोडण्यात येतील. २२९६१/२२९६२ मुंबई सेंट्रल – अहमदाबाद – मुंबई सेंट्रल वंदे भारत एक्स्प्रेस ही रेल्वेगाडी १ एप्रिल ते २७ एप्रिलपर्यंत २० डब्यांच्या रेकसह धावेल. वाढीव डब्यांमुळे प्रवाशांना वंदे भारत एक्स्प्रेसमधून प्रवास करण्याचा आनंद लुटता येईल. तसेच गाडी क्रमांक १२९३३/१२९३४ वांद्रे टर्मिनस – वटवा / अहमदाबाद – वांद्रे टर्मिनस कर्णावती एक्स्प्रेस १ एप्रिल ते २७ एप्रिलपर्यंत मुंबई सेंट्रल ऐवजी वांद्रे टर्मिनस येथून सुरू होईल आणि प्रवास संपेल.

गाडी क्रमांक १२९३३ वांद्रे टर्मिनस येथून दुपारी १.५५ वाजता सुटेल. तर, गाडी क्रमांक १२९३४ वांद्रे टर्मिनस येथे सकाळी १२.३० वाजता पोहोचेल. मधल्या स्थानकांवरील वेळापत्रकात कोणताही बदल केला नाही, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी दिली.