मुंबई : दहिसर ते अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ आणि दहिसर ते गुंदवली मेट्रो ७ मार्गिकेचे संचलन करणाऱ्या महा मुंबई मेट्रो संचलन महामंडळामधील (एमएमएमओसीएल) एका उच्च पदस्थ अधिकाऱ्याने केलेला गैरप्रकार नुकताच उघडकीस आला आहे. मेट्रो २ अ आणि ७ मार्गिकेसाठी ५०० इतके मनुष्यबळ पुरविण्याचे कंत्राट एका संस्थेस देण्यात आले असता त्या संस्थेकडून १० टक्के मनुष्यबळ कमी पुरविले जात होते. मात्र, तरीही कंत्राटदाराला मोबदला मात्र १०० टक्के अर्थात ५०० माणसांसाठीची दिला जात होता. या प्रकरणी एमएमएमओसीएलमधील उच्च पदस्थ अधिकारी दोषी आढळला असून अधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आल्याचे समजते आहे.

मेट्रो २ अ आणि ७ मार्गिकेच्या संचलनासंबंधीच्या विविध कामांसाठी ५०० इतके मनुष्यबळ पुरविण्यासाठी एमएमएमओसीएलकडून निविदा काढण्यात आली होती. त्याचे कंत्राट डी.एस.एंटरप्रायझेस या संस्थेस मिळाले. या संस्थेकडून मनुष्यबळ पुरविण्यास सुरुवात झाली. मात्र ५०० इतके मनुष्यबळ पुरविण्याचे कंत्राट असताना प्रत्यक्षात मात्र १० टक्के कमी मनुष्यबळ पुरविले जात होते. कमी मनुष्यबळ असतानाही संस्थेला एमएमएमओसीएलकडून १०० टक्के अर्थात ५०० मनुष्यबळाचा आर्थिक मोबदला दिला जात होता. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) महानगर आयुक्त डॉ संजय मुखर्जी यांच्या लक्षात हा गैरप्रकार आला. त्यानंतर त्यांनी एमएमएमओसीएलच्या व्यवस्थापकीय संचालिका रुबल अग्रवाल यांना या गैरप्रकारची तात्काळ चौकशी करण्याचे आदेश दिले.

हेही वाचा…दीदीची उणीव सतत भासते – हृदयनाथ मंगेशकर, ‘शिवचरित्र-एक सोनेरी पान’ या गीताचे मंगेशकर यांच्या उपस्थितीत लोकार्पण

महानगर आयुक्तांच्या आदेशानुसार चौकशी केली असता एचआर विभागातील अधिकाऱ्यांनी हा गैरप्रकार केल्याचे उघडकीस आले झाले. चौकशीअंती अधिकारी दोषी आढळल्याने त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली असून महामंडळातून हकालपट्टी करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. या गैरप्रकाराची संचलन आणि वित्त विभागाकडून पुन्हा सखोल चौकशी करण्यात येत असल्याचेही सुत्रांनी स्पष्ट केले

हेही वाचा…कोकण रेल्वेच्या टप्पा दुहेरीकरणाला वेग, प्राथमिक अहवाल रेल्वे मंडळाकडे सुपूर्द

सुमारे चार कोटींचा गैरव्यवहार

मागील दोन वर्षांपासून कंत्राटदारास १०० टक्के आर्थिक मोबदला दिला जात असल्याचेही चौकशीत समोर आले आहे. महिन्याला अंदाजे १५ लाख रुपये अतिरिक्त दिले जात होते. एकूणच सुमारे चार कोटींचा यात गैरव्यवहार झाल्याचे म्हटले जात आहे. याचा मोठा आर्थिक फटका एमएमएमओसीएलला बसला आहे.