मुंबई : महाराष्ट्रात दुष्काळाची तीव्रता वाढत असताना आणि नागरिकांना पिण्याच्या पाण्यात १० टक्के कपात करावी लागत असताना, मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) वेगाने उभ्या राहणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) डेटा सेंटरच्या पाणीवापराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या केंद्रांची पाण्याची नेमकी गरज किती, त्यासाठी पाणी कुठून उपलब्ध केले जाणार आणि स्थानिक जलस्रोतांवर त्याचा काय परिणाम होणार, याचा पाणी हक्क समितीकडून पारदर्शक व सखोल अभ्यास केला जाणार आहे.
समितीच्या वतीने नुकत्याच झालेल्या अभ्यास सत्रांमध्ये डेटा सेंटरच्या वाढत्या विस्तारासह त्यांचा वीज आणि पाणीवापर, पर्यावरणीय परिणाम तसेच स्थानिक रहिवाशांना भेडसावणाऱ्या समस्यांवर चर्चा करण्यात आली. दोन्ही सत्रांमध्ये मिळून सुमारे ५० सामाजिक कार्यकर्ते, संशोधक, विद्यार्थी, पत्रकार आणि स्थानिक रहिवासी सहभागी झाले होते.
डेटा सेंटरमध्ये मोठ्या प्रमाणावर संगणकीय यंत्रणा कार्यरत असतात. कृत्रिम बुद्धिमत्तेशी संबंधित प्रक्रिया हाताळण्यासाठी अशा केंद्रांची गरज वाढत असली, तरी या यंत्रणा चोवीस तास सुरू ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात वीज आणि यंत्रणा थंड ठेवण्यासाठी पाणी आवश्यक असते. त्याचबरोबर या केंद्रांना वीजपुरवठा करणाऱ्या वीज प्रकल्पांमध्येही पाण्याचा वापर होतो. त्यामुळे डेटा सेंटरच्या प्रत्यक्ष पाणीवापराबरोबरच त्यासाठी लागणाऱ्या विजेच्या निर्मितीमुळे होणाऱ्या पाणीवापराचाही विचार करण्याची गरज असल्याचे मत अभ्यास-सत्रात व्यक्त करण्यात आले.
विशाखापट्टणमच्या अनुभवावर चर्चा
विशाखापट्टणम येथे उभारण्यात येत असलेल्या एक गिगावॅट क्षमतेच्या मोठ्या एआय डेटा सेंटरचा संदर्भ चर्चेत घेण्यात आला. गुगल आणि अदानी समूहाच्या भागीदारीत उभारण्यात येत असलेल्या या प्रकल्पाला स्थानिक रहिवाशांकडून विरोध होत आहे. मुंबई महानगर प्रदेशातील डेटा सेंटरची वाढ, त्यांची उभारणी करण्यामागील कारणे, पाणीपुरवठ्याची सद्यःस्थिती आणि ठाण्यातील डेटा सेंटरच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांचे अनुभव यांवर चर्चा झाली.
ठाण्यातील रहिवाशांनी डेटा सेंटरच्या बांधकामामुळे रात्रंदिवस आवाजाचा त्रास होत असल्याची तक्रार मांडली. डेटा सेंटरमुळे उष्णता, ध्वनिप्रदूषण आणि हवेच्या गुणवत्तेवर होणारे संभाव्य परिणाम यांचाही अभ्यास करण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली. तसेच, नवीकरणीय ऊर्जेचा वापर करण्याचे प्रयत्न होत असले, तरी प्रत्यक्ष वीजपुरवठ्यात कोळशावर आधारित वीज आणि डिझेल जनरेटरचा वापर किती होतो, याचीही तपासणी आवश्यक असल्याचे मत सहभागींकडून मांडण्यात आले.
परवानग्या आणि पाणीवापराची माहिती खुली करण्याची मागणी
डेटा सेंटरच्या उभारणीसाठी नियोजन, परवानग्या आणि पर्यावरणीय मंजुरी देण्याच्या प्रक्रियेत पुरेशी पारदर्शकता नसल्याची चिंता व्यक्त केली गेली. या प्रकल्पांना मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या चौकटीत आणून त्यांच्या परिणामांची योग्य तपासणी करणाऱ्या यंत्रणांमार्फत देखरेख केली जावी, अशी मागणीही करण्यात आली.
मुंबई महानगर प्रदेशातील डेटा सेंटरचा जलस्रोतांवर होणारा परिणाम समजून घेण्यासाठी पाणी हक्क समिती स्वतंत्र अभ्यास सुरू करणार आहे. या अभ्यासातून मिळणारी माहिती सार्वजनिक केली जाणार असल्याचे समितीने स्पष्ट केले. या उपक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी panihaq@gmail.com या ई-मेलवर संपर्क साधावा, असे आवाहन समितीचे निमंत्रक सिताराम शेलार यांनी केले आहे.
