मुंबई : मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणातील सर्वच मोठ्या शहरांतील वाहनतळाच्या समस्येवर मार्ग काढण्यासाठी नगरविकास विभागाच्या अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना केली जाईल. ही समिती वाहनतळासाठी धोरणात्मक निर्णय घेईल, तसेच वाहनतळाच्या प्रश्नांवर शिफारशी करेल, अशी माहिती विधान परिषदेत मंत्री उदय सामंत यांनी दिली. निरंजन डावखरे यांनी लक्षवेधीद्वारे हा प्रश्न उपस्थित केला होता. प्रवीण दरेकर यांनी चर्चेत सहभाग घेतला.
ठाणे महापालिकेला वाहनतळ धोरणाबाबत लोकप्रतिनिधींना विश्वासात घेण्याच्या सूचना दिल्या जातील. ठाणे शहरात विविध ठिकाणी वाहनतळ विकसीत करण्याचे नियोजन आहे. गावदेवी वाहनतळ, गावदेवी भूमिगत वाहनतळ, नाईकवाडी वाहनतळ, पार्किंग प्लाझा वाहनतळ, कशिष पार्क वाहनतळ, व्हिव्हियाना मॉल येथे वाहनतळाची व्यवस्था केली आहे. ठाणे शहरात सध्या २,१५२ वाहनांचे वाहनतळ निर्माण करण्यात आले आहे. आणखी २,०८५ वाहनांचे वाहनतळ प्रस्तावित आहे. ठाणे शहराच्या विकास आराखड्यात ७.७१ हेक्टरवर दोन ट्रक टर्मिनन्स होणार आहेत. शहरात ५५ ठिकाणी वाहनतळाच्या आरक्षणाचा प्रस्ताव राज्य सरकारकडे आला आहे, त्याला लवकरच मंजुरी देऊ, असेही सामंत म्हणाले.
मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणातील सर्वच मोठ्या शहरांतील वाहनतळांचा प्रश्न गंभीर आहे असून, सरकारला त्याची जाणीव आहे. वाहनतळाच्या समस्येवर मार्ग काढण्यासाठी नगरविकास विभागाच्या अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली जाईल. समिती मुंबई महानगर क्षेत्रातील सर्व लोकप्रतिनिधींशी चर्चा करेल आणि सर्वंकष नियोजन आराखडा तयार करेल, अशी माहितीही सामंत यांनी दिली.
