मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) वाहतूक कोंडी दूर करून अंतर्गत वाहतूक व्यवस्था मजबूर करण्यासाठी अनेकविध रस्ते प्रकल्प राबवले जात आहेत. एमएमआरला मोठा समुद्रकिनारा लाभला असून वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी जलवाहतुकीला चालना देण्याचा निर्णय महाराष्ट्र सागरी मंडळाने घेतला आहे.

त्यानुसार एमएमआरमध्ये नवीन १० मार्गांवर जलवाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेऊन यासाठी सविस्तर आराखड्याचे काम हाती घेण्यात आले. हे काम आता अंतिम टप्प्यात असून लवकर सल्लागार कंपनीकडून आराखडा सागरी मंडळाला सादर केला जाणार आहे. त्यानंतर पुढील प्रक्रिया पूर्ण करून एमएमआरमधील १० जलमार्गांवर जल मेट्रो सुरू केली जाणार आहे.

सागरी मंडळाकडून सध्या २१ जलमार्गांवर जल वाहतूक चालविली जाते. एकूण ८५ किमीचे हे २१ जलमार्ग आहेत. जल वाहतूक ही अतिजलद वाहतुकीचा एक पर्याय आहे. एमएमआरला मोठा समुद्र लाभला आहे. त्यामुळे एमएमआरमधील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी आणि जल वाहतुकीचा अतिजलद पर्याय उपलब्ध करण्यासाठी सागरी मंडळाने आणखी नवीन १० जलमार्ग विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यानुसार या नवीन १० जलमार्गांचा सविस्तर आराखडा तयार करण्यासाठी मेसर्स कोची मेट्रो लिमिटेड या कंपनीची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, या जलमार्गांचा आधी व्यवहार्यता तपासणी अहवालही पूर्ण करण्यात आला आहे. त्यानंतर सविस्तर आराखड्याचे काम हाती घेण्यात आले होते.

आता सविस्तर आराखड्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याची लेखी माहिती सागरी मंडळाने खासदार रवींद्र वायकर यांना कळवली. आराखडा पूर्ण करून येत्या काही दिवसातच तो सागरी मंडळाला सादर केला जाणार आहे. हा आराखडा सादर झाल्यानंतर हे १० जलमार्ग नेमके कसे असणार, त्यावर कोणत्या प्रकारच्या जल मेट्रो धावणार, त्यासाठी किती खर्च येणार यासह अनेक बाबी स्पष्ट होतील.

त्यानंतर मुंबई व आसपासच्या नवी मुंबई, ठाणे, कल्याण, वसई, मीरा-भाईन्दर या शहरांभोवती असलेल्या जलमार्गाचा लगडा होईल. आराखडा अंतिम झाल्यानंतर १० जलमार्गांवर जल मेट्रो सुरू करण्याच्यादृष्टीने पाऊले उचलली जातील, अशी माहिती सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. प्रदीप यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.

मुंबई, मिरा-भाईंदर,वसई-विरार, कल्याण, ठाणे या ठिकाणी हे १० जलमार्ग असणार असून येथे लवकरच जल मेट्रो धावणार आहे. सध्या २१ जलमार्गांवर जलवाहतूक सुरू असून ते जलमार्ग ८५ किमीचे आहेत. नवीन १० जलमार्ग वाहतूक सेवेत दाखल झाल्यास ८५ किमीचे जलमार्ग एकूण २०० किमीचे होतील, असेही पी. प्रदीप यांनी सांगितले.

१० नवीन जलमार्ग कार्यान्वित झाल्यास एमएमआरमध्ये जाण्यासाठी रस्ते, मेट्रो, सागरी मार्ग, सागरी सेतू, बेस्ट यासह जलवाहतुकीचा एक पर्यायही उपलब्ध होणार आहे. प्रवास अतिजलद होणार आहे. जल मेट्रो हा अतिजलद आणि आरामदायी प्रवासाचा पर्याय असल्याने प्रवाशांची यास पसंती मिळेल अशी आशाही व्यक्त केली जात आहे.