मुंबई : ‘कुलाबा – वांद्रे – सीप्झ मेट्रो ३’ मार्गिकेतील पावसाळापूर्व कामांनी वेग घेतला आहे. ही सर्व कामे अंतिम टप्प्यात असून आता लवकरच मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी) पावसाळ्यासाठी सज्ज झाले आहे. एमएमआरसी ३३.५ किमी लांबीच्या भुयारी मेट्रो मार्गिकेचे बांधकाम करीत आहे. या मार्गिकेदरम्यान पावसाळापूर्व कामे हाती घेण्यात आली आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मार्गिकेच्या परिसरादरम्यान पावसाळ्यात पाणी साचू नये यादृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आदेश सर्व कंत्राटदारांना देण्यात आले आहेत. कंत्राटदारांच्या माध्यमातून पावसाळापूर्व कामे सुरू आहेत. ही सर्व कामे पावसाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन आहे. पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी पर्जन्य जलवाहिन्या स्वच्छ करणे, त्यातील गाळ काढून टाकणे, तसेच कॅच पिट्स बांधणे आदी कामे प्रगतीपथावर आहेत. पावसाळ्यात वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये यासाठी दिशादर्शक, सूचना चिन्हे, वाहतूक चिन्हे यांची नव्याने रंगरंगोटी करण्यात येत आहे.

हेही वाचा >>> मुंबई: विवाहासाठी धर्मांतर केलेल्या प्रियकराचा प्रेयसीला जीवे मारण्याचा प्रयत्न; आरोपीला अटक

बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी रस्ता रोधकांची दृश्यमानता वाढविण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात येत आहे. तसेच नियमितपणे वीजेच्या तारा, केबल वायर्स आदींचे ऑडिटही करण्यात येणार आहे. बांधकामास्थळी साचलेल्या पाण्यामुळे डासांची उत्पत्ती होऊ नये यासाठी विशेष काळजी घेण्यात येणार आहे. सर्व ठिकाणी पुरेशी रोषणाई करण्यात येणार आहे. रस्त्यांवरील खड्डे व खराब भागाच्या दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत. तसेच गटारांची खराब झाकणे बदलण्याचे कामही सुरू आहे.

हेही वाचा >>> मुंबईत रेल्वेचा १४ तासांचा मेगा ब्लॉक; कुठे-कधी ? वाचा सविस्तर…

मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार समन्वय साधून एमएमआरसीतर्फे पावसाळापूर्व कामे करण्यात येत आहेत. पावसाळ्यात पुरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी आवश्यकतेनुसार पाण्याचा उपसा करणारे पंप उपलब्ध करण्यात येणार आहेत. साधारण १.५ एचपी ते ७५ एचपी क्षमतेचे एकूण ३७१ पंप उपलब्ध करण्यात येणार आहेत. एमएमआरसीकडून ‘मेट्रो – ३’ मार्गावर पावसाळ्याशी संबंधित तक्रारींचे निराकरण करण्यासाठी आपत्कालीन नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. आपत्कालीन नियंत्रण कक्षाशी मोबाइल क्रमांक ९१ ९१३६८०५०६५ आणि ९१ ७५०६७०६४७७ वर नागरिकांना संपर्क साधता येईल.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mmrc ready water should not accumulate during monsoon mumbai print news ysh
First published on: 02-06-2023 at 17:42 IST