Ghodbunder Road Traffic Solution : ठाण्यातील घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनला असून वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ठाणे खाडी किनारा प्रकल्प (ठाणे कोस्टल रोड) हाती घेतला आहे. या प्रकल्पातील खारेगाव – गायमुख टप्प्याच्या कामाला वेग देण्यात आला आहे. आतापर्यंत या टप्प्यातील पायाभरणीचे ५० टक्के काम पूर्ण झाले आहे. तर पिअर कॅप, आय-गर्डर उभारणीच्या कामालाही वेग देण्यात आला आहे. हा १३.४५ किमीचा टप्पा डिसेंबर २०२८ पर्यंत पूर्ण करून वाहतूक सेवेत दाखल करण्यात येणार आहे. हा टप्पा सेवेत दाखल झाल्यास घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडीतून वाहनचालक-प्रवाशांची मुक्तता होणार आहेच, पण त्याचवेळी खारेगाव – गायमुख अंतर केवेळ १५ मिनिटांत पार करता येणार आहे.

मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी एमएमआरडीएने विविध पायाभूत सुविधा प्रकल्प हाती घेतले आहेत. यात ठाण्यासाठीच्या प्रकल्पांचा सर्वाधिक समावेश आहे. ठाणे शहरातील अंतर्गत वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी, घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून एमएमआरडीएने ठाणे सागरी किनारा मार्ग प्रकल्प हाती घेतला आहे. त्यानुसार दोन टप्प्यांत या सागरी किनारा मार्गाचे काम केले जाणार आहे. यातील पहिला टप्पा खारेगाव – गायमुख असून हा टप्पा १३.४५ किमीचा आहे. तर दुसरा टप्पा बाळकूम – आनंदनगर असून या टप्प्याची लांबी ७ किमी आहे.

पहिल्या टप्प्याच्या, खारेगाव – गायमुख टप्प्याच्या प्रत्यक्ष कामाला आठ महिन्यांपूर्वी सुरुवात करण्यात आली आहे. आठ महिन्यांचा कालावधीत या टप्प्याच्या कामातील एक महत्त्वाचा टप्पा पार केल्याची माहिती एमएमआरडीएने दिली. केवळ आठ महिन्यांत पहिल्या टप्प्यातील पायाभरणीचे ५० टक्के काम पूर्ण करण्यात आले. पुलाच्या उभारणीचे ५० टक्के काम पूर्ण झाले असून सध्या पिअर कॅप आणि आय-गर्डर उभारणीची कामे वेगात सुरू असल्याचे एमएमआरडीएकडून सांगण्यात आले.

ठाणे खाडी किनारा मार्ग ठाणे वर्तुळाकार मेट्रो, साकेत – आमणे उन्नत रस्ता, कासारवडवली – खारबाव मार्ग अशा अनेक प्रकल्पांशी जोडला जाणार आहे. त्यामुळे भविष्यात प्रवाशांचा प्रवास आणखी सुकर होणार आहे. दरम्यान, २७०० कोटी रुपयांच्या सहा पदरी खारेगाव – गायमुख ठाणे खाडी किनारा मार्ग-१ चे काम डिसेंबर २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे. हा प्रकल्प पूर्ण करून वाहतूक सेवेत दाखल झाल्यास घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडी दूर होण्यास मदत होणार आहे.

अवजड, मालवाहतुकीचा घोडबंदर रोडवरील, ठाणे शहरातील अंतर्गत रस्त्यांवरील भार कमी होण्यास मदत होईल, असा दावा यानिमित्ताने केला जात आहे. हा टप्पा डिसेंबर २०२८ मध्ये सेवेत दाखल झाल्यास खारेगाव – गायमुख अंतर केवळ १५ मिनिटांत पार करता येणार आहे. आजघडीला हे अंतर पार करण्यासाठी किमान पाऊणतास लागतो. दरम्यान, बाळकुम – आनंदनगर ठाणे खाडी किनारा मार्ग-२ चा सविस्तर आराखडा तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे. आराखडा तयार करून त्याला मान्यता घेऊन पुढील प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर या टप्प्याच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे. यासाठी आणखी काही वेळ लागणार आहे. दुसरा टप्पाही सेवेत दाखल झाल्यास ठाणेकरांना मोठा दिलासा मिळेल, असे म्हटले जात आहे.