मुंबई : सप्टेंबरपासून अनिश्चित काळासाठी बंद असलेली चेंबूर – संत गाडगे महाराज मोनोरेल मार्गिका मेमध्ये पुन्हा सेवेत दाखल करण्याचे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) नियोजन आहे. मात्र मोनोरेल सेवेत दाखल करतानाच प्रवासी संख्या कशी वाढेल याचा विचार करून एमएमआरडीएने चेंबूरमध्ये मोनोरेल आणि मेट्रो थेट परस्परांशी जोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मेट्रो २ ब (अंधेरी पश्चिम – मंडाले, मानखुर्द) मार्गिकेतील चेंबूर मेट्रो स्थानक चेंबूर येथील व्हिएनपी – आरसी मार्ग मोनोरेल स्थानक पादचारी पुलाद्वारे जोडण्यात येणार आहे. हा १३० मीटर लांबीचा पादचारी पूल असणार आहे. हा पूल सेवेत दाखल झाल्यास मेट्रोतून उतरून मोनोरेलमध्ये आणि मोनोरेलमधून उतरून मेट्रोत जाता येणार आहे.

मोनोरेल गाड्यांची कमी संख्या, उपलब्ध गाड्यांची दुरवस्था आणि सातत्याने होणारे अपघात, दुर्घटना यामुळे मोनोरेल मार्गिकेवर टीका होत आहे. तर दुसरीकडे या मार्गिकेला प्रवाशांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने मार्गिका तोट्यात आहे. या मार्गिकेवर ऑगस्ट २०२५ मध्ये मोठी दुर्घटना घडली. त्यानंतरही दुर्घटनांची मालिका सुरूच असल्याने अखेर सप्टेंबर २०२५ मध्ये एमएमआरडीएने या मार्गिकेवरील सेवा अनिश्चित काळासाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.

सेवा बंद असल्याच्या कालावधीत नवीन देशी बनावटीच्या गाड्या ताफ्यात दाखल करून त्यांची चाचण्या घेणे, मोनोरेलचे संपूर्णपणे अत्याधुनिकीकरण करण्यात येणार आहे. तर मोनोरेलची सुरक्षा चाचणी यशस्वी झाल्यानंतरच मोनोरेल सेवेत दाखल करण्याचाही निर्णय एमएमआरडीएचा आहे. त्यानुसार आता बऱ्यापैकी चाचण्या पूर्ण झाल्या असून नव्या गाड्याही ताफ्यात दाखल झाल्या आहेत, जुन्या गाड्यांचेही नूतनीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे आता आवश्यक त्या सुरक्षा चाचण्या पूर्ण करून सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त करून मोनोरेलची सेवा पुन्हा सुरू करण्याच्यादृष्टीने हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. त्यानुसार मे महिन्यात मोनोरेल पुन्हा मुंबईत धावणार आहे. मात्र ही सेवा पुन्हा सुरू करतानाच मोनोरेलला तोट्यातून कसे काढता येईल, मोनोरेलची प्रवासी संख्या कशी वाढेल यादृष्टीने एमएमआरडीएकडून विचार सुरू आहे. त्यातूनच मोनोरेल आणि मेट्रो परस्परांशी जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मोनोरेल मार्गिकेतील व्हीएनपी – आरसी मार्ग स्थानक आणि मेट्रो २ ब मार्गिकेतील चेंबूर मेट्रो स्थानक अंदाजे १८० मीटर अंतरावर आहे. त्यामुळे या दोन्ही स्थानकांना एकमेकांशी पादचारी पुलाद्वारे जोडण्यात येणार असल्याची माहिती एमएमआरडीएतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. तर महानगर आयुक्त डाॅ. संजय मुखर्जी यांनी त्यास दुजोरा दिला. १८० मीटरचे अंतर कसे कमी करता येईल याचा विचार करून एमएमआरडीएने पादचारी पुलाची आखणी केली आहे. हे अंतर १३० मीटरवर आणण्यात आल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. हे अंतर खूपच कमी असल्याने अवघ्या काही मिनिटांतच प्रवाशांना मोनोरेल स्थानकतून मेट्रो स्थानकात आणि मेट्रो स्थानकातून मोनोरेलमध्ये स्थानकात जाता येणार आहे.

या निर्णयामुळे मोनोरेलची प्रवासी संख्या वाढेल अशी आशा एमएमआरडीएला आहे. त्यामुळेच मेट्रो २ ब मार्गिकेतील दुसऱ्या टप्प्यातील एकमेव चेंबूर मेट्रो स्थानक एप्रिलपर्यंत पूर्ण करण्यात येणार असून हे स्थानक एप्रिलअखेरीस वाहतूक सेवेत दाखल करण्याच्यादृष्टीने एमएमआरडीएचे प्रयत्न सुरू आहेत. तर दुसरीकडे पादचारी पुलाच्या कामाला लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे. चेंबूर नाका येथील या पादचारी पुलासाठी एक खासगी मालमत्ता संपादित करावी लागणार आहे. ही जागा संपादित करण्यात काही अडचणी असल्याने कामाला विलंब होत आहे. मात्र लवकरच हा प्रश्न निकाली निघेल आणि पादचारी पूल वेगाने पूर्ण होईल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. या पुलासाठी १२ ते १५ कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याचेही त्यांनी सांगितले.